नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालय परिसराची आणि स्मृती मंदिर परिसराची रेकी केल्याचा आरोप असलेला कथित दहशतवाद्याच्या जामिनावरील निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राखून ठेवला आहे. रईस शेख असे या आरोपीचे नाव आहे. त्याला नागपूरच्या दहशतवाद विरोधी पथकाने सप्टेंबर २०२१ मध्ये काश्मिर येथून ताब्यात घेतले होते.
या प्रकरणावर न्यायमूर्ती नितीन सुर्यवंशी आणि न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांच्या समक्ष सुनावणी झाली. काश्मिर पोलिसांनी एका प्रकरणात रईसला अटक केली असता त्याने १५ जुलै २०२१ मध्ये नागपुरात रेकी केल्याचे चौकशीत समोर आले होते. त्यावेळी रईस जुलैमध्ये नागपूरला गेला होता. कोणाला संशय येऊ नये म्हणून त्याने श्रीनगर ते दिल्ली, दिल्ली ते मुंबई आणि मुंबई ते नागपूर असा विमानातून प्रवास केला.
त्यानंतर एका हॉटेलमध्ये रुम बूक केली आणि रिक्षाने दोन्ही ठिकाणांची रेकी केली. या ठिकाणांचा व्हिडीओ घेऊन हस्तकाला पाठवला. त्यामुळे कोतवाली पोलिसांनी रईस शेखच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि पुढे त्याला काश्मिरात जाऊन ताब्यात घेतले होते. पाकव्याप्त काश्मीरमधून जैश-ए- मोहम्मदच्या हस्तकाच्या सांगण्यावरून रईस शेख जुलै २०२१ मध्ये नागपुरात आला होता.
नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची इमारत आणि हेडगेवार स्मृती मंदिराची त्याने पाहणी केली आणि तो काश्मिरला परतला, असा आरोप त्याच्यावर आहे. न्यायालयाने सर्व बाजू लक्षात घेत प्रकरणावरील निकाल राखून ठेवला. रईस शेखतर्फे ॲड. निहालसींग राठोड यांनी तर राज्य शासनातर्फे मुख्य सरकारी वकील, ज्येष्ठ विधिज्ञ देवेन चौहान यांनी बाजू मांडली.