सागर निकवाडे
नंदुरबार : भारतीय सैन्य दलात कार्यरत जवान सुटी घेऊन घरी आलेले होते. परिवारासोबत होळी साजरी केली. यानंतर मेव्हणीचा विवाह असल्याने त्यासाठी निघालेल्या जवानावर काळाने घाला घातला. दोंडाईचा- शिंदखेडा रस्त्यावर शिंदखेडा शहरातील लक्ष्मीनारायण मंदिरासमोर अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात सुटीवर आलेल्या जवानाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
तालुक्यातील लोणखेडा गावात राहणाऱ्या भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले नंदलाल यशवंत शिरसाट (वय ३१) असे मृत जवानाचे नाव आहे. नंदलाल शिरसाट यांची नुकताच जम्मू येथे बदली झाली होती. याठिकाणी रुजू झाल्यानंतर जवान नंदलाल हे नुकताच होळीच्या सुट्टीत निमित्ताने आपल्या गावी आले होते. पत्नी व मुलांसोबत यंदाची हि होळी अखेरची ठरली असून नंदलाल यांच्या मृत्यूने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मेव्हणीच्या हळदीला जाताना अपघात
दरम्यान लोणखेडा येथील जवान नंदलाल शिरसाठ यांच्या मेव्हणीचा विवाह होता. यामुळे ते लोणखेडा येथून भोरखेडा येथे मेहुणीच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी दुचाकीवरून जात होते. याच वेळी येथील लक्ष्मीनारायण मंदिराजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने नंदलाल यांचा जागीच मृत्यू झाला.
थोड्या दिवसात जाणार होते ड्युटीवर
होळीच्या सणानिमित्ताने नंदलाल हे काही दिवसांची सुटी घेऊन गावी आले होते. यातच मेव्हणीचा विवाह सोहळा आटोपल्यानंतर ते जम्मू येथे ड्युटीवर हजर होणार होते. यापूर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे. जवान नंदलाल यांच्या पश्चात ५ वर्षाचा मुलगा आणि पत्नी आहे. दरम्यान नंदलाल शिरसाठ यांचे मोठे बंधू चेतनकुमार शिरसाठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिंदखेडा पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.