आयपीएल 2025 स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्सशी 23 मार्चला होणार आहे. या सामन्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. मागच्या पर्वात केलेल्या चुकीमुळे पहिल्याच सामन्यात हार्दिक पांड्याला मुकावं लागणार आहे. तसेच सूर्यकुमार यादव पहिल्या सामन्यात कर्णधारपद भूषवणार आहे. असं असताना मुंबईचं टेन्शन आणखी एका कारणामुळे वाढलं आहे. गोलंदाजीचा मुख्य आधारस्तंभ असलेला जसप्रीत बुमराह सुरुवातीच्या सामन्यांन मुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे 23 मार्चला चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यात जसप्रीत बुमराह खेळणार नाही, हे जवळपास निश्चित झालं आहे. 19 मार्चला मुंबई इंडियन्सचा मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने याने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्याने सांगितलं की, ‘जसप्रीत बुमराह स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये कधी परतेल याबद्दल निश्चित माहिती नाही.’ बुमराहची गैरहजेरी संघासाठी मोठं आव्हान आहे. बुमराह सध्या एनसीएमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली पुनर्वसन प्रक्रियेतून जात आहे.
महेला जयवर्धने यांच्या विधानामुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांची धाकधूक वाढली आहे. दुसरीकडे, बुमराह तब्येतीबाबत एनसीएकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसेच आयपीएल खेळण्याबाबत हिरवा कंदील मिळालेला नाही. त्यामुळे बुमराह स्पर्धेतील पहिल्या सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. जसप्रीत बुमराह 2013 पासून मुंबई इंडियन्ससाठी खेळत आहे. त्याने मागच्या काही वर्षात 133 सामन्यात 165 विकेट घेतल्या आहेत. दुखापतीमुळे 2023 आयपीएल स्पर्धेला मुकला होता. आता पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सवर तशीच वेळ येते की काय? असा प्रश्न क्रीडाप्रेमींच्या मनात घर करून आहे. मुंबई इंडियन्सकडे ट्रेंट बोल्ट, दीपक चाहर, रीस टॉपले आणि कॉर्बिन बॉश यासारखे वेगवान गोलंदाज आहेत. तसेच कर्णधार हार्दिक पांड्या, अनकॅप्ड अश्विनी कुमार, सत्यनारायण राजू, अर्जुन तेंडुलकर आणि राज अंगद बावाही आहे.
मुंबई इंडियन्स संघ: हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, बेव्हॉन जेकब्स, रायन रिकेल्टन, रॉबिन मिंगे, कृष्णन श्रीजीत, नमन धीर, राज अंगद बावा, विघ्नेश पुत्तूर, विल जॅक्स, मिचेल सँटनर, अर्जुन तेंडुलकर, अश्विनी कुमार, रीस टोप्ले, कर्ण शर्मा, ट्रेंट बोल्ट, दीपक चहर, वेंकट सत्यनारायण राजू, मुजीब-उर-रहमान, कॉर्बिन बाश.