शशी कपूर यांचा जन्म 18 मार्च 1938 रोजी कोलकात्यात झाला. त्यावेळी त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर न्यू थिएटरमध्ये काम करत होते.
शशी कपूर यांचा जन्म होत असताना त्यांचं डोकं मोठं असल्यामुळे त्यांच्या आईला प्रसूतीदरम्यान खूप त्रास सहन करावा लागला.
त्यावेळी त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं शशी कपूर यांना रुग्णालयात उपचारासाठी नेणं शक्य नव्हतं.
त्यांचं डोकं मोठं असल्यामुळे त्यांच्या आईनं शशींचे केस कुरळे ठेवले होते, जेणेकरून त्यांचं डोकं मोठं दिसणार नाही.
शशी यांच्या आजीनं त्यांचं नाव बलबीरराज कपूर ठेवलं होतं. त्यांच्या आईला हे नाव अजिबात आवडायचं नाही. त्यांना लहानपणापासूनच चंद्र बघायला आवडायचं म्हणून त्यांनी त्यांचं नाव 'शशी' ठेवलं.
शशी कपूर यांच्या जन्मानंतर दुसऱ्याच वर्षी पृथ्वीराज कपूर यांचं कुटुंब मुंबईत स्थायिक झालं. शशी सहा वर्षांचे वर्षांचे असताना, त्यांना मुंबईतील डॉन बॉस्को स्कूलमध्ये दाखल करण्यात आलं.
सुरुवातीच्या काळात शशी कपूर आणि फारुख इंजिनीयर एकाच बाकावर बसायचे. हेच फारुख इंजिनिअर नंतर भारताचे प्रसिद्ध क्रिकेटपटू बनले.
ते दोघे शाळेतील शेवटचे दोन तास बंक करायचे. एकाला एकजण रॉयल ओपेरा हाऊसमध्ये अभिनय शिकण्यासाठी जायचा, तर दुसरा क्रिकेटसाठी अकादमीत जायचा.
शशी कपूर यांनी 1948 साली 'आग' या चित्रपटातून बाल कलाकार म्हणून आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली. त्यावेळी ते फक्त नऊ वर्षांचे होते.
यानंतर 'आवारा' चित्रपटात त्यांनी राज कपूर यांच्या बालपणाची भूनिका साकारली. या भूमिकेमुळे ते इतके लोकप्रिय झाले की त्यांचं अभ्यासातलं मनच उडालं.
'द कपूर – द फर्स्ट फॅमिली ऑफ इंडियन सिनेमा' या पुस्तकात लेखिका मधु जैन यांनी संपूर्ण कपूर कुटुंबाचा चित्रपटसृष्टीतील प्रवास मांडला आहे.
शशी कपूर यांनी आपल्या अभ्यासाविषयी त्यांना सांगितलं, "मी अभ्यासात फार चांगला नव्हतो आणि उत्तीर्ण होऊ शकलो नाही. जेव्हा मी मॅट्रिकमध्ये नापास झालो, तेव्हा कोणीही मला रागवलं वगैरे नाही. मी माझ्या वडिलांना सांगितलं की, मला कॉलेजच्या कँटीननमध्ये बसून तुमचे पैसे वाया घालवायचे नाहीत."
अभ्यास आणि नाटक कंपनीत्यानंतर, वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी, शशी कपूर यांना त्यांच्या वडिलांनी पृथ्वी थिएटरमध्ये नोकरी दिली. त्यावेळी त्यांचा पगार होता महिन्याला 75 रुपये, जो 1953 मध्ये एक मोठी रक्कम मानली जायची.
दरम्यान, तीन वर्षांच्या आत, ते 'शेक्सपियराना' या नाटक मंडळीशीही जोडले गेले. ही एक फिरत्या स्वरूपाची नाट्यसंस्था होती, जी शशी कपूर यांचे सासरे – जेफ्री केंडल यांनी स्थापन केली होती. येथेच त्यांना त्यांची पत्नी जेनिफर मिळाली, त्यांची पहिली भेट झाली तेव्हा शशी 18 वर्षांचे होते.
ब्रिटिश रंगभूमीवरील नावाजलेली अभिनेत्री आणि जेनिफरची छोटी बहीण, फॅलिसिटी केंडल, हिने आपल्या 'व्हाईट कार्गो' या पुस्तकात शशी कपूर आणि जेनिफर यांच्या प्रेमकथेच्या सुरुवातीविषयी लिहिले आहे.
फॅलिसिटी केंडल लिहितात, "जेनिफर तिची मैत्रीण वेंडीसोबत 'दीवार' हे नाटक पाहण्यासाठी रॉयल ओपेरा हाऊसमध्ये गेली होती. त्या वेळी शशी 18 वर्षांचे होते आणि त्या नाटकात त्यांनी एक छोटीशी भूमिका साकारली होती. नाटक सुरू होण्यापूर्वी त्यांनी पडद्याआडून प्रेक्षकांकडे डोकावून पाहिले आणि चौथ्या रांगेत बसलेल्या एका मुलीवर त्यांची नजर खिळली. तिला पाहताच ते जेनिफर यांच्या प्रेमात पडले."
नाटक संपल्यानंतर शशी लगेच जेनिफरजवळ गेले आणि तिला स्टेजच्या मागे जाऊन स्टेज पहायचा आहे का असे विचारलं. शशीला वाटत होतं की स्टेजमागील कलाकारांना जवळून पाहणं हा जेनिफरसाठी एक नवीन अनुभव असेल. आश्चर्याची बाब म्हणजे, जेनिफरनंही शांतपणे त्यांच्यासोबत येण्यास होकार दिला.
पण खरी गंमत अशी होती की त्या वेळी 21 वर्षीय जेनिफर स्वतःच आपल्या वडिलांच्या नाटक कंपनीची मुख्य अभिनेत्री होती. इतकेच नव्हे, तर त्यांचा पगारही शशी यांच्या पगाराच्या तिप्पट होता.
जेनिफर - पहिल्या नजरेतलं प्रेमपहिल्या नजरेतच दोघांमध्ये प्रेम फुलले. 1956 मध्ये, जेनिफरमुळे शशी कपूर 'शेक्सपियराना' मध्येही सहभागी झाले. शशींचा जेनिफरच्या वडिलांवर प्रभाव पाडता यावा म्हणून, जेनिफर यांनी इंग्रजी बोलण्याच्या शैलीपासून चालण्याच्या लकबींपर्यंत अनेक गोष्टी शिकवल्या. पण, या सगळ्याचा फारसा काही उपयोग झाला नाही.
काही काळातच 20 वर्षीय शशी आणि 23 वर्षीय जेनिफर यांनी अनपेक्षितरीत्या लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी शशी कपूर 'शेक्सपियराना'सोबत सिंगापूरमध्ये होते आणि एके दिवशी जेनिफरला समजले की त्यांचे वडील शशी आणि त्यांच्या लग्नाला कधीच संमती देणार नाहीत आणि म्हणून, त्यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला.
शशी आणि जेनिफर नाटक कंपनीतून बाहेर पडले, पण त्यांच्याकडे पैसे नव्हते. जेनिफरच्या वडिलांनी शशी यांना मानधन देण्यासही नकार दिला होता, कारण त्यांना हे लग्न मान्य नव्हते.
या परिस्थितीत, शशी कपूर एअर इंडियाच्या कार्यालयात गेले आणि त्यांनी राज कपूर यांना ट्रंक कॉल केला आणि दोन तिकिटांचे पैसे पाठवण्यास सांगितलं. राज कपूर यांनी तातडीने सिंगापूर ते मुंबई प्रवासासाठी प्रीपेड ट्रॅव्हल तिकिटांची व्यवस्था केली.
मधु जैन यांनी या लग्नाबद्दल लिहिलंय की, एका ब्रिटिश मुलीशी लग्न होत असल्यानं कपूर कुटुंबात फारसा उत्साह नव्हता. हे लग्न 2 जुलै 1958 रोजी, अवघ्या तीन तासांच्या आर्य समाज पद्धतीने पृथ्वीराज कपूर यांच्या माटुंगा येथील घरी पार पडले.
या लग्नासाठी पृथ्वीराज कपूर यांनी खास जयपूरमध्ये सुरू असलेल्या 'मुघल-ए-आझम'च्या शूटिंगमधून सुट्टी घेतली होती. चित्रपटाचे दिग्दर्शक के. आसिफ यांनी त्यांना प्रायव्हेट जेटने मुंबईत पाठवले होते.
जेव्हा निर्माते पैसे परत मागू लागलेलग्नाच्या एका वर्षातच शशी कपूर वडील झाले. 1960 मध्ये, आर्थिक अडचणींमुळे पृथ्वी थिएटर कंपनी बंद पडली.
यानंतर, शशी कपूर यांनी चित्रपटांमध्ये काम करण्याचा प्रयत्न केला. पण हे इतकं सोपं नव्हतं. बॉलीवूडमध्ये आणखी एका 'कपूर' साठी जागा नव्हती. ना पृथ्वीराज कपूर शशींसाठी काही करू शकले, ना राज कपूर.
शशी कपूर यांनी तेच केले, जे मुंबईत येणारा प्रत्येक तरुण करतो. फिल्मीस्तान स्टुडिओच्या बाहेर एका बाकावर बसून काम मिळण्याची वाट पाहणं.
मधु जैन यांना दिलेल्या मुलाखतीत शशी कपूर आपला अनुभव सांगताना म्हणाले, "पिकनिक चित्रपटासाठी मी धर्मेंद्र आणि मनोज कुमार यांच्यासोबत हा बेंच शेअर केला होता. पण तो चित्रपट शेवटी मनोज कुमार यांना मिळाला."
शशी कपूर यांना काम मिळाले, पण त्यांची सुरुवातीची चित्रपटं 'चार दिवारी', बी. आर. चोप्रांचा 'धर्मपुत्र' आणि विमल रॉय यांचे 'प्रेमपत्र' अपयशी ठरले.
परिस्थिती अशी झाली की, निर्माते आणि दिग्दर्शक शशी कपूर यांच्याकडून साइनिंग अमाउंट परत मागू लागले.
दरम्यान, 1965 मध्ये 'जब जब फूल खिले' यशस्वी झाला आणि त्यांनी पहिल्यांदा स्टारडमचा अनुभव घेतला.
पण असुरक्षिततेची भावना एवढी खोलवर बसली होती की, 1966 मध्ये एका चित्रपटासाठी साइनिंग अमाउंट म्हणून मिळालेल्या पाच हजार रुपयांना जेनिफर यांनी सहा महिने हातही लावला नाही. त्यांना भीती वाटत होती की, जर चित्रपट बंद झाला तर निर्माता परत पैसे मागायला येईल.
यशस्वी कारकीर्द'जब जब फूल खिले' नंतर शशी कपूर यांचा सुवर्णकाळ सुरू झाला. त्यांनी 'प्यार का मौसम', 'प्यार किए जा', 'नींद हमारी ख़्वाब तुम्हारे', 'हसीना मान जाएगी', 'शर्मिली', 'आ गले लग जा', 'चोर मचाए शोर' आणि 'फकीरा' या यांसारखे एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले.
'वक्त', 'दीवार', 'कभी कभी', 'रोटी, कपड़ा और मकान' आणि 'सिलसिला' या मल्टी-स्टारर चित्रपटांतील त्यांच्या भूमिकादेखील खूप लोकप्रिय झाल्या.
शशी कपूर यांच्यासाठी कोणताही चित्रपट बनवू न शकलेले राज कपूर तेव्हा 'सत्यम शिवम सुंदरम'साठी नायक शोधत होते आणि त्यांचा हा शोध शशी कपूरवर येऊन थांबला.
या चित्रपटाच्या थीमनुसार, राज कपूर यांना 'सर्वात कुरूप मुलीच्या प्रेमात पडलेला सर्वात देखणा नायक' दाखवायचा होता. तर, शशी कपूर हे हिंदी चित्रपटांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झालेले पहिले भारतीय अभिनेते होते.
ऋषी कपूर यांनी त्यांच्या 'खुल्लम खुल्ला' या आत्मचरित्रात या किश्शाचे वर्णन केलं आहे.
राज कपूर यांना आधी या चित्रपटासाठी राजेश खन्ना यांना कास्ट करायचे होते, असं त्यांनी यात नमूद केलं आहे.
बॉलीवूडमध्ये आपली ओळख निर्माण केल्यानंतर, शशी कपूर आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजले जाणारे पहिले भारतीय अभिनेता ठरले.
त्यांनी इस्माईल मर्चंट आणि जेम्स आयव्हरी यांच्यासोबत 'द हाऊसहोल्डर', 'शेक्सपियर वाला', 'बॉम्बे टॉकी' आणि 'हिट अँड डस्ट' यांसारख्या आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचं कौशल्य दाखवलं.
जेव्हा अमिताभ बच्चन यांनी शशी कपूरबरोबर एक्स्ट्रा आर्टिस्ट म्हणून काम केलं'बॉम्बे टॉकीज' चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी एका अतिरिक्त कलाकाराची भूमिका साकारली होती हे फार कमी लोकांना माहिती असेल.
'शशी कपूर - द हाऊसहोल्डर, द स्टार' या पुस्तकात असीम छाब्रा यांनी लिहिले आहे की -
'दीवार' चित्रपटाच्या प्रीमियरला अमिताभ बच्चन म्हणाले होते की, "आम्ही कधीच एकमेकांशी काही बोललो नाही. पण जेव्हा 'मेरे पास मां है...' हा संवाद म्हणायचा क्षण आला, तेव्हा मला एक मऊसूत स्पर्श जाणवला. तो शशीजींचा हात होता. ते काहीच बोलले नाही, पण ज्या पद्धतीनं त्यांनी माझा हात पकडला, त्यातच सगळं काही होतं. माझ्यासाठी हा क्षण खूप महत्त्वाचा होता. मी कधीच कल्पना केली नव्हती की, जेम्स आयव्हरी यांच्या 'बॉम्बे टॉकीज' मध्ये ज्यांच्यासमोर मी एक्स्ट्रा आर्टिस्ट म्हणून काम करत होतो, त्यांच्यासोबत एक दिवस मला मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळेल."
मजेशीर गोष्ट म्हणजे, ज्या दृश्यात अमिताभ बच्चन एक्स्ट्रा आर्टिस्ट म्हणून दिसले होते, ते सीनच चित्रपटातून कापण्यात आला होता.
शशी कपूर यांच्या चित्रपट आणि अभिनयाबाबत त्यांची समर्पित वृत्ती पाहायची असेल, तर दोन गोष्टींची नोंद घ्यायला हवी एक म्हणजे शशी कपूर यांचा अभिनय आणि दुसरं म्हणजे पृथ्वी थिएटरची पुनर्स्थापना.
1978 मध्ये शशी कपूर यांनी पत्नी जेनिफर कपूर यांच्यासह पृथ्वी थिएटर पुन्हा सुरू केले. ही तीच जागा होती, जिथे त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर यांनी थिएटर सुरू केलं, आणि आर्थिक अडचणींमुळे ते बंद पडलं होतं. विशेष म्हणजे, राज कपूर आणि शम्मी कपूर यांनी यात काही मदत केली नाही, पण शशी कपूर यांनी स्वतःच्या कमाईतील मोठा भाग यात गुंतवला. पृथ्वी थिएटर सुरू करण्यासाठी त्यांनी बजाज कुटुंबाकडून जमीन विकत घेतली.
वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याची धडपडशशी कपूर यांना नेहमीच जाणवत होते की त्यांना वडिलांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करायचं आहे. याची झलक त्यांनी दीपा गेहलोत यांच्यासोबत लिहिलेल्या 'पृथ्वीवाला' मध्ये पाहायला मिळते.
यात पृथ्वीराज कपूर यांच्या शेवटच्या क्षणांचा उल्लेख आहे. त्या काळात पृथ्वीराज कपूर कॅन्सरने ग्रस्त होते आणि टाटा मेमोरियल रुग्णालयात दाखल होते. तर, शशी कपूर त्यावेळी इंग्लंडमध्ये होते, अखेर डॉक्टरांनी हात टेकले.
शशी कपूर यांनी लिहिले आहे की, "जेव्हा पापाजींनी दार उघडण्याचा आवाज ऐकला तेव्हा ते पटकन वळले. राजजींनी मला सांगितलं की ते हलूही शकत नव्हते. पण माझी उपस्थिती जाणवताच त्यांनी डोकं हलवलं. त्यांच्या चेहऱ्यावर स्मितरेषा होती, मी त्यांचा हात धरून त्यांच्या शेजारी बसलो होतो, काही तासांनी ते गेले. ते रात्रभर जागे होते आणि राजजी त्यांच्या कानात कुजबुजत होते – "शशी येतोय..."
पृथ्वी थिएटर व्यतिरिक्त, शशी कपूर यांनी त्यांच्या वडिलांचे सामाजिक कार्य देखील पुढे नेले. त्यांनी पृथ्वीराज कपूर मेमोरियल स्थापन करून शेकडो विधवांना दरमहा आर्थिक मदत केली.
शशी कपूर यांनी 'फिल्मवाला'ची स्थापना केली आणि 'जुनून', '36 चौरंगी लेन', 'कलयुग', 'विजेता', 'उत्सव' आणि 'अजूबा' सारखे चित्रपट बनवले. यापैकी 'जुनून', '36 चौरंगी लेन' आणि 'कलयुग' हे अतिशय महत्त्वाचे समांतर चित्रपट मानले जातात.
तोट्यात चित्रपट बनवलेशशी कपूर यांनी मधु जैन यांना सांगितले की, "मी 'कलयुग'मध्ये 10 लाख, 'विजेता'मध्ये 40 लाख रुपये, '36 चौरंगी लेन'मध्ये 24 लाख रुपये, 'उत्सव'मध्ये 1.5 कोटी रुपये आणि 'अजूबा'मध्ये 3.5 कोटी रुपये गमावले."
शशी कपूर यांच्या पत्नी जेनिफर यांचं 1984 साली कर्करोगानं निधन झालं, तोपर्यंत शशी कपूर बॉलिवूडमधील सर्वात देखणे अभिनेते म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या शरीरावर एक इंचही चरबी वाढली नव्हती.
पत्नीच्या मृत्यूनंतर शशी कपूर यांची अवस्था ढासळत गेली. ते लठ्ठ तर झालेच पण एकाकीसुद्धा पडले. पण यानंतरही, त्यांनी 'न्यू दिल्ली टाईम्स' सारख्या महत्त्वाच्या चित्रपटात उत्कृष्ट अभिनय केला.
शशी कपूर यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल फॅलिसिटी केंडल यांनी व्हाईट कार्गोमध्ये लिहिले आहे की, "ते खूप हसतमुख आणि आकर्षक होते. मी कधीच इतक्या रोमान्सप्रिय व्यक्तीला भेटले नव्हते. ते कुणाच्याही कौतुकात भरभरून बोलायचे आणि तितक्याच मोहक अंदाजात खडसवायचेही. ते खूप सडपातळ होते, पण त्यांचे डोळे मोठे आणि भावपूर्ण होते. त्यांचे चमकदार पांढरेशुभ्र दात आणि गालावरच्या खोडकर खळीमुळं ते कोणाच्याही हृदयात सहज आपलं स्थान निर्माण करायचे."
4 डिसेंबर 2017 रोजी, 79 व्या वर्षी या देखण्या अभिनेत्यानं जगाचा निरोप घेतला.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.