उरण, ता. १९ (वार्ताहर) : फुंडे येथील वीर वाजेकर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या बीएमएस आणि बीएएफ विभागाच्या वतीने ‘ग्लोबल वॉर्मिंग’ या विषयावर पोस्टर सादरीकरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना जागतिक तापमानवाढीचे परिणाम, त्याची कारणे आणि त्यावरील उपाय याबद्दल जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. विद्यार्थ्यांनी तापमानवाढीमुळे होणारे पर्यावरणीय संकट, वाढते वायू प्रदूषण, जंगलतोड, उष्णतेमुळे बर्फाच्या शिखरांचे वितळणे, हवामान बदल आणि जैवविविधतेवरील परिणाम यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर प्रभावी पोस्टर तयार केली. यासोबतच ग्रीन एनर्जीचा वापर, प्लॅस्टिकचा कमी उपयोग, झाडे लावा-झाडे जगवा यासारख्या उपाययोजनांवरदेखील विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून विचार मांडले. प्रभारी प्राचार्य डॉ. अमोद ठक्कर यांनी विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे निरीक्षण करून त्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बीएमएस विभागप्रमुख भूषण ठाकूर आणि प्रा. प्रियांका ठाकूर, दीक्षिता म्हात्रे, रेणू सरोज आणि आरती पाटील यांनी सहकार्य केले.