नेरूळ, ता. १९ (बातमीदार) : शहरात दिवसेंदिवस विविध प्रकारच्या प्रदूषणात वाढ होत आहे. त्यामुळे नवी मुंबईतील वाढत्या वायू व ध्वनी प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या अवैध आरएमसी व डांबर कारखान्यावर कारवाईची मागणी शिवसेना ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख सिद्धराम शीलवंत यांनी केंद्रीय राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ व सिडकोकडे पत्राद्वारे केली आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आरएमसी व डांबर प्लांट सुरू ठेवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे, अटी व शर्ती ठेवल्या आहेत; परंतु या अटी-शर्तीचे पालन नवी मुंबईतील आरएमसी व डांबर प्लांट करत नसल्याने प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी नवी मुंबईची दिल्ली व्हायला वेळ लागणार नसल्याचे शीलवंत यांनी पत्रात म्हटले आहे. तसेच संबंधितांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. वृक्षारोपण न करणे, सांडपाणी प्रक्रिया न करता नैसर्गिक नाल्यात सोडणे, हवा-वायू प्रदूषण होऊ नये, यासाठी पाणी शिंपडण्याची कोणतीही व्यवस्था न करणे, कच्च्या मालाची जागा पूर्णपणे न झाकणे, त्याचप्रमाणे मार्गदर्शन तत्त्वानुसार आरएमसी व डांबर प्लांट योग्यरित्या बंदिस्त करणे, कंपनी परिसरात घातक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची कोणतीही प्रक्रिया यंत्रणा नसणे, हे सारे प्रकार या कंपन्यांत घडत आहेत. त्यामुळे सरकारच्या अटी व नियमांना तिलांजली दिली जात असल्याचे समोर येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. प्रदूषणास कारणीभूत ठरत असलेल्या घटकावर नियमित कारवाई केली जाते. यापुढेही केली जाईल, असे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी सतीश पडवळ यांनी सांगितले.
----------
प्रदूषणाचा विषय विधिमंडळात मांडा!
आरएमसी व डांबर उत्पादन करणारे सर्व कारखाने हे सिडकोच्या जमिनीवर आहेत. सिडकोच्या भूमापन विभागाकडून या प्लांटला कोणतीही परवानगी दिली गेली नाही. हे सर्व कारखाने सिडकोच्या जागेवर अतिक्रमण करून अनधिकृतरित्या सुरू असल्याची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत प्राप्त झाल्याचे शीलवंत यांनी पत्रात नमूद केले आहे. प्रदूषणास कारणीभूत ठरत असलेल्या कारखान्यावर कारवाई व्हावी, यासाठी मुंबई येथील सेनेचे आमदार वरूण देसाई यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन कारवाई करण्याची व विधिमंडळात हा विषय मांडण्याची मागणी केली आहे.