जागतिक चिमणी दिन
पिंपरी, ता. १९ : लहानपणी अंगणातील झाडावर चिमण्यांचं घरटं सहज दिसायचं. चिऊताईचा किलबिलाट ऐकू यायचा. आता शहरात चिमण्यांची संख्या कमी झाली आहे. या सिमेंटच्या जंगलात लाडक्या चिऊताईला दाणा-पाणी सहज मिळावा, यासाठी जुनी सांगवी येथील संगीता जोगदंड या प्रयत्न करत आहेत.
‘‘शहरीकरण आणि प्रदूषणामुळे चिमण्यांसह इतर पक्ष्यांनीही मानवाचा सहवास सोडल्यात जमा आहे. गावाखेड्याचे रुपांतर शहरात होऊ लागले आहे, शेतजमीन जाऊन सिमेंटचे रस्ते निर्माण होऊ लागले आहेत. यामुळे हक्काचा निवारा असलेले झाडही पक्ष्यांसाठी उरलेले नाही. यामुळे गेल्या सात वर्षांपासून दरवर्षी मी चिमण्यांसाठी प्लास्टिकच्या भांड्यांमध्ये घरासमोर व जिन्याला आणि गॅलरीत पाण्याने भरलेले टोपले आणि बर्ड फीडर ठेवते आहे. त्यात गहू, बाजरी, ज्वारी, तांदूळ हे धान्य टाकते. विशेषत: उन्हाळ्याच्या दिवसांत सकाळ-सायंकाळी चिमण्या येथे येतात. जणू त्यांची शाळाच भरते,’’ असे जोगदंड यांनी सांगितले.
उन्हाळ्यामध्ये पक्षांना अन्न व पाण्याची गरज भासते आहे. नागरिकांनी आपापल्या परीने चार महिने तरी पक्ष्यांसाठी धान्य व पाण्याची सोय करावी. काही चिमण्या पहाटेपासून गॅलरी येतात. त्यांचा आवाज ऐकून खूप आनंद वाटतो.
- संगीता जोगदंड, पक्षीप्रेमी