भिवंडी, ता. १९ (वार्ताहर)ः शहर स्वच्छतेसाठी भिवंडी पालिकेला दोन अत्याधुनिक अशा सक्शन आणि जेंटिंगच्या गाड्या देण्यात आल्या आहेत. मंगळवारी ही दोन्ही वाहने पालिकेच्या सेवेत दाखल झाली. त्यामुळे स्वच्छ भिवंडीसाठी पालिका सज्ज झाली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छता अभियान टप्पा २ अंतर्गत सर्वच महापालिकांमध्ये स्वच्छतेविषयी काळजी घेत आहे. याच अनुषंगाने पालिकेला सात वर्षांसाठी ही वाहने देण्यात आली आहेत. या वाहनांचे परिचालन कर्मचारी पुणे येथील आर्यन कंपनी संस्थेमार्फत पुरविले जाणार आहेत. तसेच वाहनांची निगा व दुरुस्तीचा खर्च नगर परिषद संचालनालयामार्फत केला जाणार आहे. त्यामुळे पालिकेला कोणताही आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार नाही, शिवाय वाहनांच्या समावेशामुळे मलवाहिन्या, भूमिगत गटारे, सेफ्टी टँकसोबत तुंबलेली गटारे, नाले यांच्या स्वच्छतेवर भर दिला जाणार आहे. या वाहनांमध्ये पुनर्वापर प्रक्रिया केलेले पाणी शहर स्वच्छतेसाठी वापरता येणार असल्याची माहिती पालिका उपायुक्त शैलेश दोंदे यांनी दिली.