कर्जत, ता. २० (बातमीदार) : तालुक्यातील कोल्हारे ग्रामपंचायतच्या हद्दीत असलेल्या गावठाणात अनधिकृत बांधकाम करून भूखंड लाटण्याचा प्रयत्न होत आहे. या प्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. ग्रामस्थ संजय विरले यांनी, याबाबत महिनाभरापूर्वी जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार, कर्जत पंचायत समिती, ग्रामपंचायतीसह पोलिस ठाण्यात तक्रारीही केल्या आहेत, मात्र कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
मौजे धामोते येथील सर्व्हे नंबर १/१ मध्ये गावठाण क्षेत्रावर बांधकाम सुरू आहे. धामोते येथील पाण्याच्या टाकीजवळ भराव टाकण्याचे काम सुरू असून, यामुळे येथील जलस्रोत व पर्यावरणीय समतोल बिघडण्याची शक्यता आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कारवाईकडे दुर्लक्ष होत असल्याने भविष्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. परिसरातील अनधिकृत बांधकामावर १५ दिवसांत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत अनेक बेकायदा इमारती उभ्या राहत आहेत. यामुळे ग्रामस्थांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांनी ग्रामसेवकांवर आणि ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. ग्रामपंचायतीच्या हद्दीत महाराष्ट्र राज्यातील नवीन सरकारी नियमांचे उल्लंघन करून परवानग्या दिल्या जात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
कोल्हारे ग्रामपंचायतीमार्फत अनधिकृत कामांवर कारवाई होणे अपेक्षित आहे, मात्र कारवाई होत नसल्यास यासंदर्भात अधिक माहिती घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.
- सुशांत पाटील, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, कर्जत
महसूल दप्तरी असलेल्या रेकॉर्डप्रमाणे फेरफार क्रमांक ४४८ नुसार सदर मिळकत ही खुली गावठाण जागा आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय गावठाण मिळकती हस्तांतरण करता येणार नाही, असे नमूद असताना सरकारी आदेशाचे उल्लंघन करून काम सुरू आहे.
- संजय विरले, ग्रामस्थ, धामोते