Nagpur News : प्रशांत कोरटकरच्या घरावर कोल्हापूर पोलिसांचा छापा; पत्नीची चौकशी, जबाबही नोंदविले
esakal March 21, 2025 03:45 AM

नागपूर - कोल्हापूर येथील प्रसिद्ध इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देत, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी फरार असलेल्या प्रशांत कोरटकरच्या बेसा येथील घरी गुरूवारी (ता. २०) छापा टाकला. यावेळी कोल्हापूर पोलिसांनी पत्नीची चौकशी करीत, त्यांचे जबाब नोंदविल्याची माहिती आहे.

प्रशांत कोरटकर याच्यावर कोल्हापुरात गुन्हा दाखल आहे. यापूर्वी त्याच्या शोधासाठी २७ फेब्रुवारीला कोल्हापूर पोलिस नागपुरात येऊन गेले. यावेळी पोलिसांनी रायपूर, छत्तीसगढ आणि वर्ध्यातील हिंगणघाटमध्ये त्याचा शोध घेतला. त्यानंतर १ मार्चला बेलतरोडी पोलिसांनीही कोरटकरविरुद्ध गुन्हा दाखल केला. हा गुन्हा कोल्हापूर पोलिसांकडे वर्ग केला.

मात्र, कोरटकरने न्यायालयात धाव घेत, तात्पूरता जामीन घेतला. आता पुन्हा एकदा सुनावनीदरम्यान त्याचा जामीन न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे त्याच्या शोधासाठी कोल्हापुरातील एका पोलिस उपनिरीक्षकासह पाच जणांचे पथक बुधवारी रात्री नागपुरात आले. त्यांनी कोरटरकच्या घरी छापा टाकला.

मात्र, कोरटकर अद्यापही फरार असल्याने पोलिसांनी कोरटकर याची पत्नी पल्लवी यांची चौकशी केली. प्रशांतबाबत माहिती नसल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्यांचे जबाब नोंदविले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.