Karad News : निवास थोरातांच्या साखर सहसंचालकांनी दिलेल्या निर्णय़ाविरोधात स्वाभिमानीची उच्च न्यायलयात धाव; काय घडल्या घडामोडी?
esakal March 21, 2025 03:45 AM

कऱ्हाड - यशवंतनगर (ता. कऱ्हाड) येथील सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या २५१ अर्जांची छाननी झाली. त्यातील २९ उमेदवारी अर्ज बाद झाले तर २०५ उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. दाखल अर्जापैकी मानसिंगराव जगदाळे आणि निवासराव थोरात या दोघांच्या अर्जावर हरकत घेण्यात आली होती.

त्यावरील निकाल निवडणुक निर्णय अधिकारी संजयकुमार सुद्रीक यांनी देत दोघांचेही अर्ज छाननीत बाद केले. त्यामुळे संबंधितांसह १० जणांनी प्रादेशिक साखर सहसंचालक निलीमा गायकवाड यांच्याकडे अपिल दाखल केले होते.

त्यावर निवास थोरात यांच्यासह संबंधित नऊ जणांचे अर्ज वैध ठरवुन मानसिंगराव जगदाळे यांचा अर्ज अवैध ठरवल्याचा निकाल सहसंचालकांनी दिला. त्यातील सहसंचालकांनी दिलेल्या निवास थोरात यांच्या निकालावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हरकत घेवुन अपील दाखल केले आहे.

सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीसाठी २५१ उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्याची छाननी निवडणुक निर्णय अधिकारी संजयकुमार सुद्रीक, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी अपर्णा यादव, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक राहूल देशमुख, सहाय्यक निबंधक (प्रशासन) संजय जाधव यांच्या उपस्थितीत झाली.

छाननीत २३४ उमेदवारांच्या दाखल २५१ उमेदवारी अर्जापैकी २०५ उमेदवारांचे २१८ अर्ज वैध ठरले तर २९ उमेदवारांचे ३३ अर्ज अवैध ठरले. अवैध ठरलेल्या २९ पैकी २६ उमेदवारांचे अर्ज त्यांनी मागील पाच ऊस गळीत हंगामापैकी किमान तीन हंगामात कारखान्याला ऊस घातला नसल्याने अवैध ठरले आहेत.

एक अर्ज उमेदवाराकडे सहकारी बँकेची थकबाकी असल्याने एक अर्ज कलम ८८ अन्वये जबाबदारी निश्चित झालेने व एका उमेदवाराच्या अर्जावर सूचकाचा तपशील नसल्याने व अनुमोदक नसल्याने सदर अर्ज अवैध ठरले आहेत. त्यामुळे छाननी नंतर २०५ उमेदवार शिल्लक राहिले होते.

उमेदवार अर्जांची छाननी सुरु असताना मुरलीधर गायकवाड यांनी निवास थोरात यांच्या अर्जावर तर वसंतराव जगदाळे यांनी मानसिंगराव जगदाळे यांच्या अर्जावर हरकत घेतली होती. त्याची सुनावनी निवडणुक निर्णय अधिकारी सुद्रीक यांच्यासमोर झाली. त्यामध्ये निवडणुक निर्णय अधिकारी यांनी श्री. थोरात व श्री. जगदाळे यांचे दोन्ही अर्ज बाद झाल्याचा निकाल दिला होता.

त्यावर प्रादेशिक साखर सहसंचालक श्रीमती गायकवाड यांच्याकडे संबंधितांनी अपिल दाखल केले होते. त्यावर शुक्रवारी सुनावनी झाली. त्याचा निकाल आज जाहीर करण्यात आला. त्यामध्ये अपिल दाखल झालेल्या १० पैकी निवास थोरात यांच्यासह नऊ जणांचे अर्ज वैध ठरले तर मानसिंगराव जगदाळे यांचा अर्ज अवैध ठरला आहे. त्यामुळे सत्ताधारी गटाला धक्का बसला आहे.

दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साखर सहसंचालक यांच्या निवास थोरात यांच्या निकालाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हरकत घेवुन अपील दाखल केले आहे. त्यामुळे निवडणुकीतील व्टिस्ट वाढले आहे.

मानसिंगराव यांच्या भुमिकेकडे लक्ष

सह्याद्री कारखान्याच्या उमेदवारीसाठी मानसिंगराव जगदाळे यांनी दाखल केलेल्या अपिलावर प्रादेशिक साखर सहसंचालक श्रीमती गायकवाड यांनी त्यांचा अर्ज अवैध ठरवल्याचा निकाल दिला आहे. त्यावर अपिलासाठी आता उच्च न्यायालयाचाच पर्याय आहे. त्यामुळे उच्च न्यायालयात अपिल दाखल करण्यासाठीची कार्यवाही करण्यासाठी संबंधितांना काही दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यावर आता ते काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.