नागपूर - नागपूर शहरातील महाल परिसरात भडकलेल्या दंगलीचा सूत्रधार फहीम खान याने युवकांना भडकाविल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सायबर पोलिसांनी त्याची दखल घेत त्याच्यावर ‘कलम-१५२’ नुसार देशाच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.
सोमवारी महाल भागात एका समुदायातील युवकांनी परिसरातील घरांवर तुफान दगडफेक केली. वाहनांची तोडफोड आणि जाळपोळही करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी धरपकड मोहीम राबविली त्यात शंभराहून अधिक युवकांना अटक करण्यात आली आहे.
या तपासात मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा (एमडीपी) शहराध्यक्ष असलेल्या फहीम खान याने सोमवारी औरंगजेबाची कबर तोडण्यासाठी झालेल्या निषेध आंदोलनात पुतळा आणि प्रतिकात्मक कबर जाळण्याच्या विरोधात युवकांना एकत्र करून गणेशपेठ पोलिसांना आंदोलनकर्त्यांविरोधात धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल करून अटकेची मागणी केली होती.
दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यानंतर फहीमने रात्रीच्या नमाजनंतर युवकांना एकत्र करून त्यांना भडकाविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महाल परिसरातील भालदारपुऱ्यातून राड्यास सुरुवात झाली.
डेमोक्रॅटिक पार्टीचा फहीम खान याच्या चिथावणीखोर वक्तव्यातून शेकडो युवकांनी एकत्र येत हल्ला केल्याची बाब समोर आली आहे. पोलिसांनी त्याला अटक करीत गुन्हा दाखल केला. यावेळी त्याने चिथावणीखोर व्हिडिओची तपासणी करून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.