मुंबई - शेतीत ‘एआय’ वापराच्या यशस्वी प्रयोगानंतर आता महाराष्ट्रात सुरु असलेल्या विविध लोकोपयोगी उपक्रमात ‘मायक्रोसॉफ्ट’चे बिल गेट्स मदत करणार आहेत. गेट्स यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्याची त्यांची ही पहिलीच वेळ आहे.
या ‘डिजिटल गव्हर्नन्स’ आणि ‘राईट टू सर्व्हिस’मध्ये महाराष्ट्राचे मॉडेल देशभरात मांडण्यासाठी मायक्रोसॉफ्ट आणि गेट्स फाउंडेशनकडून सहकार्याचे आश्वासन त्यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महिला स्वयंरोजगाराच्या २५ लाख लखपती दीदींच्या उद्दिष्टपूर्तीसाठीही ते मदत करतील. या उपक्रमात सहभाग घेऊन महिलांना उद्योजक बनविण्यात गेट्स फाउंडेशनने भागीदारी घेण्याची तयारी दर्शविली. गडचिरोली जिल्ह्यात मलेरिया निर्मूलनासाठी गेट्स मदत करणार आहेत.
बिल गेट्स तसेच गेट्स फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सह्याद्री राज्य अतिथिगृह येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी गेट्स आणि फडणवीस यांच्यादरम्यान आरोग्य, कृषी आणि पायाभूत सुविधांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत सकारात्मक चर्चा झाली.
या भेटीप्रसंगी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ श्रीकर परदेशी, गेट्स फाउंडेशनचे भारतातील संचालक हरी मेनन, गेट्स फाउंडेशनच्या जागतिक मलेरिया प्रकल्पाचे संचालक फिलिप वेलकॉफ, आरोग्य सल्लागार डॉ. आनंद बंग आदी उपस्थित होते. फडणवीस यांना सियाटल भेटीचे आमंत्रणही गेट्स यांनी दिले.
बिल गेट्स यांची पहिल्यांदाच भेट होत असल्याचा आनंद असल्याचे सांगून फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात आधुनिकतेशी नाते संगणारे बदल होत आहेत. शेती ,पायाभूत प्रकल्प आरोग्य यात जनतेचे आयुष्य सुकर करणारे प्रयत्न सुरू आहेत. त्यांना गती देण्यासाठी गेट्स फाउंडेशन समवेत असले तर कामाला आणखीनच वेग येईल.
ग्रामीण भागात डॉक्टरांची कमतरता असल्याने दर्जेदार आरोग्य सेवा-सुविधा देण्यासाठी गेट्स फाउंडेशनने सहकार्य करावे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर आरोग्य आणि कृषी क्षेत्रामध्ये करण्यासाठी अर्थसंकल्पातही तरतूद केली आहे. पुणे जिल्ह्यात ‘एआय’च्या वापरातून उसाचे दुप्पट उत्पादन घेतल्याचे उदाहरणही मुख्यमंत्र्यांनी दिले.
शेतकऱ्यांना दिवसाही वीज उपलब्ध होण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी २०२२-२३ पासून सौर ऊर्जेचा वापर करण्यात येत आहे. एकेकाळच्या ३० टक्के वीज निर्मितीमधून आता ५२ टक्क्यांपर्यंत सौर वीजनिर्मिती होत असल्याने शेतकऱ्यांना कमी खर्चात वीज उपलब्ध होत आहे. त्यांना २४ तास वीज देण्यासाठी विजेचे सर्व फिडर सोलरद्वारे करण्याचे नियोजन असल्याची माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी गेट्स यांना दिली.
नवी मुंबई येथे ३०० एकर परिसरात नावीन्यपूर्ण शहर करण्यात येत असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. यावर गेट्स यांनी नावीन्यपूर्ण शहर आणि इतर उपक्रमासाठी आर्थिक बाबीसोबत तांत्रिक मदतीत भागीदारी करण्याची ग्वाही दिली.
क्रिस्पर केस नाईन आणि दुग्ध उत्पादन वाढीसाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यास मायक्रोसॉफ्ट प्रयत्नशील आहे. महाराष्ट्रातील गरीब कुटुंबांना शाश्वत उपजीविकेच्या माध्यमातून गरिबीतून बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानासाठी भागीदारी करणार आहे.
फडणवीस यांनी महिला सबलीकरण आणि स्वयंरोजगारासाठी २५ लाख महिला लखपतीदीदी करण्याचे उद्दिष्ट निश्चित केल्याचे सांगितले. या उपक्रमातही सहभाग घेण्यास मायक्रोसॉफ्ट आणि गेट्स फाउंडेशन तयार असल्याचेही गेट्स यांनी सांगितले. महिलांचे संपूर्ण आर्थिक व्यवहार डिजिटल करण्यासाठी सहकार्य करण्याची तयारी गेट्स यांनी दर्शवली.
मलेरियामुक्त महाराष्ट्रासाठी प्रयत्न
महाराष्ट्रात डासांमुळे मलेरिया आजाराच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मलेरियामुक्त महाराष्ट्र करण्यासोबतच डेंगी नियंत्रणासाठी गेट्स फाउंडेशन प्रयत्नशील आहे. यासाठीही तांत्रिक, आर्थिक मदत करण्यात येणार असून गडचिरोली जिल्ह्यापासून याची सुरूवात करण्यात येणार असल्याची ग्वाही गेट्स यांनी दिली.
‘महाराष्ट्राचे मॉडेल जगभरात नेणार’
महाराष्ट्रात विविध सामाजिक संस्था, शासकीय संस्था, कंपन्यांच्या सहकार्याने शाश्वत ऊर्जेसाठी भागीदारी घेणार असून याचा शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचेही गेट्स यांनी सांगितले. महाराष्ट्रात मोठी क्षमता असल्याने महाराष्ट्राचे विकासाचे मॉडेल जगभर नेण्यास प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली.