गाजलेला खटला! मुलाच्या बारशाला मिलिटरीतून आला अन् भावजयीवर बंदूक चालवून तुरुगांत गेला! स्वत:ला घ्यायची जमीन चुलत भावांनी घेतल्याने केले कांड, आरोपीला जन्मठेप
esakal March 21, 2025 04:45 AM

सोलापूर : सांगोल्यातील उदनवाडी येथील बिरूदेव नामदेव पांढरे हा कोहीमा नागालॅण्ड येथे सैन्यात कार्यरत होता. त्याचा संसार सुखाचा सुरू होता, पण पहिल्याच मुलाच्या बारशाला सुट्टी काढून गावी आलेल्या बिरूदेवने आठ एकर जमिनीच्या वादातून चुलत भाऊ दत्तात्रय पांढरे व त्यांचे भाऊ जयवंत व अर्जुन यांच्यावर बंदूक चालवली. त्यात ते बचावल्याने, पण बिरूदेवने बंदुकीत भरलेल्या दुसऱ्या बारने चुलत भावजय उज्वला पांढरे यांचा जीव घेतला. या गुन्ह्यात बिरुदेवला पंढरपूर न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

उदनवाडी (ता. सांगोला) येथील प्रभाकर लक्ष्मण देशपांडे यांच्याकडील सगळीच जमीन आरोपी बिरूदेवला घ्यायची होती. त्यातून त्याने बालपणी एकमेकांच्या अंगाखांद्यावर बागडलेल्या चुलत्यांवर व चुलत भावांवरच बंदूक चालवली. चुलत भाऊ दत्तात्रय, जयवंत व अर्जुन यांनी देशपांडे यांची आठ एकर जमीन विकत घेतल्याचा राग बिरुदेवच्या मनात होता. त्यासाठी दोघांनीही एकमेकांविरूद्ध सांगोला कोर्टात दिवाणी दावे दाखल केले होते. तरीपण, बिरुदेवचा हव्यास संपला नव्हता. बिरुदेव सैन्यात असल्याने त्याच्याकडे दोन बोअरची बंदूक होती. मुलाच्या बारशाला आलेल्या बिरुदेवच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण असतानाही १९ जुलै २०१४ सकाळी फिर्यादी दत्तात्रय पांढरे व त्यांचे भाऊ, भावजय शेतात गेल्यावर बिरूदेवसह त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी चुलत भावांना लोखंडी पाईप, काठ्यांनी मारहाण केली.

या भांडणात बिरूदेवने स्वत:कडील बंदुकीतून चुलत भावांवर गोळ्या झाडल्या, त्यात दोघेही जखमी झाले. बार हुकल्याने बिरुदेवने परत बार भरला आणि भावजय उज्वलाच्या दिशेने गोळ्या झाडल्या. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर फरार झालेला बिरुदेव सहा महिने पोलिसांना मिळालाच नाही. एकेदिवशी गावी येऊन उसात लपून बसलेल्या बिरुदेवला पोलिसांनी पकडले. या गुन्ह्यात सरकारतर्फे ॲड. सारंग वांगीकर यांनी अचूक युक्तिवाद केला तर सांगोला पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक अजय कदम यांनी तपास केला होता.

‘त्याने’ विहिरीत सोडला होता करंट...

गुन्ह्यात वापरलेली बंदूक ज्या विहिरीत टाकल्याचे आरोपी बिरुदेवने पोलिसांना सांगितले होते, त्या विहिरीच्या मालकास पोलिसांनी बोलावून तीन दिवस विहिरीतील पाणी उपसले, पण बंदूक काही मिळाली नाही. दरम्यान, ज्यावेळी पोलिस विहिरीवर गेले, त्यावेळी विहिरीत करंट सोडल्याची बाब पोलिसांना समजली. गुन्ह्यात ही बाब पोलिसांनी घेतली नाही, पण असा प्रकार झाल्याचे खासगीत पोलिसांनी सांगितले.

शिक्षा लागल्यावर ‘तो’ ढसाढसा रडला

मुलाच्या बारशाला मिलिटरीतून गावी आलेल्या बिरुदेव पांढरे याने जमिनीच्या वादातून सख्ख्या चुलत भावांवर बंदूक चालवली व भावजयीचा जीव घेतला. आरोपीतर्फे बचाव करण्यात आला, पण आम्ही उच्च, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर करीत युक्तिवाद केला. न्यायालयाने तो ग्राह्य धरून आरोपीला शिक्षा ठोठावली.शिक्षा ठोठावल्यावर बिरुदेव बायकोच्या गळ्यात पडून रडला, ही बाब त्याला अगोदरच समजली असती तर कदाचित घटना घडली नसती.

- ॲड. सारंग वांगीकर, सरकारी वकील

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.