उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये महिलेनं बॉयफ्रेंडला हाताशी धरून पतीची हत्या केल्याचं प्रकरण ताजं असतानाच झाशीमध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. माजी मंत्र्याच्या सुनेचा मृतदेह बेडरूममध्ये आढळलाय. महिला तिच्या पती आणि बॉयफ्रेंडसोबत बेडरूममध्येच दारू पार्टी करत होती. यावेळी झालेल्या वादानंतर महिलेची हत्या करण्यात आली. भाडेकरून या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरवाजा तोडून पोलिसांनी आत प्रवेश केला. बेडवर महिलेचा मृतदेह पडला होता. तिच्या शेजारी बॉयफ्रेंड दारूच्या नशेत झोपला होता. तर तिचा पती खोलीत एका बाजूला सोफ्यावर होता. पोलिसांनी दोघांनाही अटक केलीय. महिलेच्या चेहऱ्यावर, गळ्यावर आणि शरिरावर जखमांचे व्रण आढळले आहेत.
माजी मंत्री रतनलाल अहिरवार यांच्या भावाची सून सगीता हिची तिच्या पतीने आणि बॉयफ्रेंडने हत्या केली. संगीता पती रविंद्र आणि ३ मुलांसोबत राहत होती. मोठी मुलगी एंजलने सांगितलं की, गुरुवारी रात्री ९ वाजता रोहित वाल्मीक दारू घेऊन घरी आला होता. आई संगीता, रोहित आणि रविंद्र हे तिघेही दारू घेऊन बेडरूममध्ये गेले. आतून बेडरूमचा दरवाजा बंद केला. तिन्ही मुलांना भाडेकरूकडे पाठवलं. त्यानंतर बराच वेळ दारू पार्टी सुरू होती.
मुलीने सांगितलं की, एक तासाने आम्ही खाली आलो आणि दुसऱ्या खोलीत गेलो. तेव्हा आतून मारहाणीचा आवाज आला. आई जोरजोरात ओरडत होती. मी बेडरूमजवळ गेले आणि दरवाजा वाजवला. रोहितने आतून दरवाजा उघडून मला १०० रुपये दिले आणि बाहेर जाऊन काहीतरी घे असं सांगत दरवाजा बंद केला. त्यानंतर तो आईला मारहाण करत होता.
मुलगी एंजल या घटनेनंतर घाबरली आणि दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या भाडेकरू शकुंतला यांच्याकडे गेली. शकुंतला यांनीही दरावाजा उघडण्याचा प्रयत्न केला. पण दरवाजा आतून बंद होता. शेवटी पोलिसांना कॉल करून बोलावण्यात आलं. पोलिसांनी दरवाजा तोडला तर समोर महिलेच्या मृतदेहाशेजारी तिचा बॉयफ्रेंड होता. तर पती समोरच्या सोफ्यावर पडला होता. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आणि पोलीस ठाण्यात नेलं.
बेडरूममधून दारूच्या तीन बाटल्या जप्त केल्या आहेत. संगीताची तीन मुलं असून मोठी मुलगी १२ वर्षांची तर लहान मुलगा ५ वर्षांचा आहे. पोलिसांनी सांगितले की, संगीता अहिरवार यांचा मृतदेह बेडरूममध्ये आढळला. त्याच रूममध्ये महिलेचा पती आणि बॉयफ्रेंडही होते. घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर पुढील कारवाई केली जाईल.