इंफाळ/चुरचुंदापूरः मैतेई समुदायातील न्यायाधीशांना कुकी-झू बहुल भागात जाण्यापासून रोखण्याबाबत घेतलेला निर्णय मागे घेण्यात यावा असे आवाहन ऑल मणिपूर बार असोसिएशनने (एएमबीए) चुरचुंदापूर जिल्ह्यातील बार असोसिएशनला केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या सहा न्यायाधीशांचे पथक शनिवारी मणिपूरमधील चुरचुंदापूरला भेट देणार असून तेथील परिस्थितीचा आढावा घेणार आहे. त्याचप्रमाणे ते येथे मदत साहित्याचे वाटपही करणार आहेत. न्यायाधीश भूषण गवई, न्यायाधीश सूर्य कांत, न्यायाधीश विक्रम नाथ, न्यायाधीश एम.एम. सुंदरेश, न्यायाधीश के. व्ही. विश्वनाथ आणि न्यायाधीश एन. कोटेश्वर सिंह यांचा या पथकात समावेश आहे. यातील एन. कोटेश्वर सिंह हे मैतेई समुदायातील आहेत.
‘‘न्यायाधीशांचा हा दौरा पूर्ण अराजकीय आहे, त्यामुळे या पथकातील सदस्यांना विरोध न करता त्यांचे स्वागत करावे,’’ असे आवाहन ‘एएमबीए’ने चुरचुंदपूरमधील बार असोसिएशनला केले आहे. दरम्यान, मैतेई समुदायातील न्यायाधीशांना जिल्हा बंदी करण्याबाबतचा निर्णय हा द्वेष भावनेतून नव्हे तर जनभावनेचा आदर करत घेण्यात आला आहे,’’ असे मत चुरचुंदापूर येथील बार असोसिएशनने ‘एएमबीए’ला कळविले आहे. स्थानिक प्रशासनाने या दौऱ्याबाबत आमच्याकडे स्पष्टीकरण मागविले होते, त्याचप्रमाणे येथे कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला, अशी स्थानिक बार असोसिएशनच्या अध्यक्षांच्या वतीने देण्यात आली. न्यायाधीशांच्या सुरक्षेसाठीच हा निर्णय असल्याचेही या संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
स्थानिक संस्थेचा विरोध
सर्वोच्च न्यायालयाच्या सहा न्यायाधीशांचे पथक पहिल्यांदाच हिंसाचारग्रस्त मणिपूरचा दौरा करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर चुरचुंदापूर येथील स्थानिक बार असोसिएशनच्या वतीने एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले होते, येथे शांतता आणि कायदा-सुव्यवस्था टिकावी यासाठी मैतेई समुदायाच्या माननीय न्यायाधीशांना जिल्हात येऊ नये, असे या निवेदनात म्हटले होते. त्यानंतर हा दौरा राजकीय नसल्याने कोणत्याही न्यायाधीशांना जिल्ह्यात येण्यापासून रोखू नये असे आवाहन ‘एएमबीए’ने स्थानिक बार असोसिएशनला केले.