आयपीएल 2025 स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात आरसीबीने साजेशी कामगिरी केली असं म्हणायला हरकत नाही. आरसीबीचा कर्णधार रजत पाटिदार याने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. गोलंदाजी करताना आरसीबीने कोलकात्याचे 8 गडी बाद करत 174 धावांवर रोखलं. खरं तर हे आव्हान सोपं असल्याने सहज गाठेल असा विश्वास क्रीडाप्रेमींना आहे. दरम्यान या धावांचा पाठलाग करण्यासाठी रनमशिन्स विराट कोहली आणि फिल सॉल्ट ही जोडी मैदानात उतरली. या जोडीने आक्रमक सुरुवात करत पॉवर प्लेमध्ये कोलकात्याच्या गोलंदाजांचं कंबरडं मोडलं. मिस्ट्री गोलंदाज वरुण चक्रवर्ती यालाही सोडलं नाही. या सामन्यात नाणेफेकीचा कौल झाला तेव्हा विराट कोहलीने एक विक्रम आपल्या नावावर केला. विराट कोहलीचा टी20 क्रिकेट कारकिर्दितील हा 400वा सामना आहे. अशी कामगिरी करणारा तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. टी20 फॉर्मेटमध्ये भारताकडून सर्वाधिक सामने खेळण्याचा मान रोहित शर्माकडे आहे. त्याने 448 सामने खेळले आहेत. त्यानंतर दिनेश कार्तिकचा नंबर लागतो. त्याने 412 सामने खेळले आहेत.
दुसरीकडे, विजयासाठी दिलेल्या 175 धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीने सावध खेळी केली. यासह विराट कोहलीने दुसरा विक्रम नोंदवला. विराट कोहलीने 28 धावा करताच सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत टॉप 5 मध्ये सहभागी झाला आहे. कोहलीने आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. त्याने 8 हजारपेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
विराट कोहली टी20 क्रिकेटमध्ये 13 हजार धावा करण्याच्या वेशीवर आहे. अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय फलंदाज होणार आहे. कोहलीनंतर रोहित शर्मा 11830 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्रिस गेल (14562), अॅलेक्स हेल्स (13610), शोएब मलिक (13537) आणि किरॉन पोलार्ड (13537) यांनी 13 हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम आधीच केला आहे.
कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, अंगकृष्ण रघुवंशी, सुनील नरेन, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, टीम डेव्हिड, कृणाल पंड्या, रसिक दार सलाम, सुयश शर्मा, जोश हेजलवुड, यश दयाल