जव्हार, ता. २३ (बातमीदार) : तालुक्यात केवळ खरीप हंगामात पावसाच्या पाण्यावर शेती करण्यात येते. शेतीची कामे आटोपल्यानंतर शेतकरी, शेतमजूर, अल्पभूधारक हा आपापल्या कुटुंबाची गुजराण करण्यासाठी शहराची धाव घेतो. यावर पर्याय म्हणून सरकारच्या विहीर सिंचनाच्या निरनिराळ्या योजना कार्यान्वित झाल्या आहेत. त्याच्या अनुदानात भरघोस वाढ करण्यात आली आहे. आता विहिरींसाठी चार लाखांचे अनुदान मिळणार आहे.
जव्हार तालुक्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, तर अनुसूचित जातीमधील शेतकऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबविली जाते. या योजनांतून पात्र लाभार्थ्यांना विहीर खोदण्यासाठी अडीच लाख रुपये देण्यात येत होते. आता या रकमेत दीड लाखांची वाढ करून ती चार लाख रुपये करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ अनुसूचित जाती-जमातीतील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांच्या शेती उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी सरकार विविध योजना राबविते. त्याचाच एक भाग म्हणून सरकारने शेतीला सिंचनाचा लाभ व्हावा, या हेतूने बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि डॉ. आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत अडीच लाखांचे अनुदान मिळत असल्याने अनेकांची विहीर खोदताना मोठी आर्थिक कोंडी होत असे. याचा विचार करून आता सरकारने या अनुदानात मोठी वाढ केली आहे.
उत्पन्नाची अटही रद्द
शेतकऱ्यांना विहिरीचे अनुदान मिळावे, यासाठी वार्षिक दीड लाख रुपये उत्पन्नाची अटही रद्द करण्यात आली आहे. हे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होते. अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमधील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून जीवनमान उंचावण्यासाठी या योजना कृषी विभागामार्फत राबवत आहेत.
अटींमध्ये शिथिलता
विहिरीच्या अनुदानाचा लाभ घेताना तो शेतकरी अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील असणे गरजेचे आहे, याशिवाय त्याच्याकडे सक्षम प्राधिकरणाने दिलेला जातीचा दाखला, विहिरीसाठी किमान एक एकर जमीन असणे गरजेचे आहे. त्याच्या नावे सातबारा आठ अ असावा. तसेच त्याचे वार्षिक उत्पन्न दीड लाखापेक्षा कमी असणे ही अटही कमी करण्यात आली आहे.
अनुसूचित जाती-जमातीच्या शेतकऱ्यांना विहीर घेण्यासाठी मोठी संधी आहे. आता त्या शेतकऱ्यांना अडीच लाखाऐवजी चार लाखांचे अनुदान मिळणार आहे, तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
- डी. एस. चित्ते, गटविकास अधिकारी, जव्हार