rat21p2.jpg
52606
वेळास : कासवालयाचे निर्मितीच्या मागणीसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून प्रस्ताव सादर करताना हेमंत सालदुरकर, संदीप राजपुरे, लुकमान चिखलकर, अॅड. राकेश साळुंखे व अन्य.
--------------
कासवांचे गाव वेळासला होणार ‘कासवालय’
उपमुख्यमंत्री अजित पवारांचा प्रतिसाद; पर्यटन विकासासाठी महत्वपूर्ण
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २१ः कासवांचे गाव म्हणून प्रसिद्धी पावलेल्या वेळास येथे कासवालयाच्या निर्मितीसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे वेळासला वेगळी ओळख मिळणार असून, या निमित्ताने गावात आणखी पर्यटक येऊन गावाच्या विकासाला गती मिळणार आहे.
वेळास येथील समुद्रकिनारी आढळून येणारे ऑलिव्ह रिडले जातीच्या समुद्री कासवाचा जन्मोत्सव पाहण्यासाठी देश, राज्यभरातील अनेक पर्यटक या गावास दरवर्षी भेट देतात. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरील निसर्गरम्य वातावरणात पसरलेल्या या गावात सागरी कासव संवर्धन मोहीम सुरू झाली. या मोहिमेच्या माध्यमातून हजारो कासवांना जीवनाचा नवीन मार्ग मिळाला आहे. कासवांचे गाव ही नवीन ओळख आणखी पुढे नेण्यासाठी येथे जागतिक दर्जाचे कासव संग्रहालय उभे करण्यात यावे, या मागणीसाठी येथील ग्रामस्थ आग्रही आहेत. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव हेमंत सालदुरकर यांनी रत्नागिरी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन प्रस्ताव सादर केला. त्याला उपमुख्यमंत्री पवार यांनी सकारात्मक चर्चा करून वेळास येथील प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही सुरू करण्याचे आश्वासन दिले.
या वेळी मंडणगडचे राष्ट्रवादी युवक अध्यक्ष लुकमान चिखलकर, राष्ट्रवादीचे ओबीसी जिल्हाध्यक्ष अॅड. राकेश साळुंखे, राजेंद्र पड्याळ, केतन दरिपकर, निशांत भाटकर, भालचंद्र नागवेकर, सुनील खाडे, सालेम सय्यद आदी उपस्थित होते.
कासव संग्रहालय कसे असावे, याचा पूर्ण आराखडा येथील ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सचिव हेमंत सालदुरकर यांनी तयार केला आहे. यात जगातील सर्व जातीच्या कासवांचे संगोपन करणे अपेक्षित आहे. त्यासाठी आवश्यक अहवाल तयार केला आहे.
चौकट
rat21p6.jpg
52620
पिल्ले समुद्रात जाताना पाहण्याचा अनुभव विलक्षण
मार्च ते एप्रिलदरम्यान साजरा होणाऱ्या या कासव महोत्सवादरम्यानच्या काळात किनाऱ्यावर अनेक कासव अंड्यातून बाहेर पडतात आणि समुद्राच्या दिशेने चालायला लागतात. ही असंख्य छोटी छोटी कासवांची पिल्ले समुद्राच्या दिशेने जाताना बघणे, हे दृश्य मन मोहित करणारे असते. हाच दुर्मिळ अनुभव घेण्याकरिता अनेक पर्यटक, अभ्यासक तसेच छायाचित्रकार वेळास समुद्रकिनाऱ्यावर हजेरी लावतात. ही इवलीशी पिल्ले त्यांच्या आयुष्यातील पहिली पाउलं टाकताना बघणे ही एक दुर्मिळ पर्वणी असते.
कोट
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी याबाबत चर्चा झाली असून, त्यांनी या प्रकल्पाला तत्त्वतः मान्यता देतो असे सांगितले. या प्रकल्पामुळे तालुक्याच्या पर्यटन विकासास गती मिळणार असून, कासव व पर्यावरणप्रेमींना त्याचा फायदा होईल.
- हेमंत सालदुरकर