52634
52635
देवगडात महाविहार मुक्ती निर्धार रॅली
बौद्ध समाजबांधव एकवटले ः राष्ट्रपतींना देण्यासाठी निवेदन सादर
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २१ : देवगड तालुका बौद्धजन सेवा संघातर्फे येथील शहरात बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती निर्धार रॅली मोर्चाचे आयोजन करण्यात आले. येथील महाविद्यालय नाका ते तहसीलदार कार्यालय अशी धम्म रॅली (मोर्चा) काढण्यात आली. यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. राष्ट्रपतींना पाठविण्यासाठी तहसीलदार रमेश पवार यांच्याकडे निवेदन दिले. दरम्यान, तालुक्यातील विविध भागांतील समाजबांधव यामध्ये सहभागी झाले होते.
आपल्या विविध मागण्यांसाठी देवगड तालुका बौद्धजन सेवा संघाच्यावतीने येथील शहरातून धम्म रॅली काढण्यात आली. येथील महाविद्यालय नाक्यापासून रॅलीला प्रारंभ झाला. यामध्ये संघाचे अध्यक्ष शामसुंदर जाधव, सचिव सुनील जाधव, सुरेश कदम, विजय कदम, पूजा जाधव, सुरभी पुरळकर, प्रियांका जाधव, विशाखा साळसकर, रश्मी पडेलकर, मनाली वाडेकर, नीतेश जाधव, आनंद देवगडकर, श्रीपत टेंबवलकर, मनोहर सावंत, पी. के. वाडेकर, डी. के. पडेलकर, राजेंद्र मुंबरकर, समीर शिरगावकर, विनायक मिठबावकर, के. एस. कदम यांच्यासह अन्य उपस्थित होते. राष्ट्रपतींना पाठविण्यासाठी येथील तहसीलदार पवार यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, ‘‘गौतम बुद्ध यांना बिहार राज्यामधील बुद्धगया याठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली, बुद्धत्व प्राप्त झाले; मात्र ते पवित्र महाबोधी महाविहार आजही बौद्ध धर्मियांच्या ताब्यात नाही. सम्राट राजा अशोकांनी महाबोधी महाविहाराची स्थापना केली, हा इतिहास आहे. सम्राट अशोकांनी ८४ हजार बुद्ध विहारे बांधली. केवळ गौतम बुद्धांच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी हे कार्य केले. बिहार येथील महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळविण्यासाठी गेली कित्येक वर्षे बौद्ध भंते प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या या लढ्याला संपूर्ण जगभरातून पाठिंबा मिळत आहे. महाबोधी महाविहार हे १९४९ च्या कायद्यानुसार समसमान प्रतिनिधींची निवड करून त्यामध्ये खरे पाहता सर्वच्या सर्व बौद्ध प्रतिनिधी नेमणे आवश्यक होते; मात्र असे न करता हे बौद्ध विहार हिंदू धर्मियांमधील महंत लोकांच्या ताब्यात दिले. या विहारामध्ये बौद्ध धर्मानुसार विधीवत प्रार्थना होत नाही. हे महाविहार हिंदू महंताच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी देशातील प्रत्येक राज्यात व गावोगावी आंदोलन करण्यात येत आहेत. या आंदोलनाला देवगड तालुका बौद्धजन सेवा संघाचा पाठिंबा आहे. हा लढा महाबोधी महाविहार मुक्तीचा असून न्याय मिळेपर्यंत हा मुक्तीसंग्राम असाच सुरू राहणार आहे.’’
...................
या आहेत मागण्या
महाबोधी महाविहार महंताच्या ताब्यातून तात्काळ मुक्त करावे. महाबोधी बुद्ध विहार बौद्ध धर्मियांच्या ताब्यात द्यावे. १९४९ मध्ये केलेला कायदा रद्द करावा व फक्त बौद्ध धर्मियांसाठीच नवीन कायदा अस्तित्वात आणावा, अशा मागण्या निवेदनाद्वारे केल्या आहेत.