मोरवाडीत कोसळली उद्यानाची सीमाभिंत
esakal March 22, 2025 01:45 AM

पिंपरी, ता. २१ ः मोरवाडी-श्रद्धा हेरिटेज सोसायटीच्या शेजारील महापालिकेची सीमाभिंत कोसळली आहे. शेजारीच लहान मुले उद्यानात खेळत होती. सुदैवाने थोडक्यात ती मुले बचावले. दुसरीकडे दररोज सुरक्षारक्षक नसल्याने उद्यानात मद्यपींचा धिंगाणा असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. प्रथमदर्शनी स्थानिकांनी सांगितल्याप्रमाणे मद्यपींनी भिंत फोडल्याचे सांगण्यात येत आहे. होळीच्या दिवशी भिंत कोसळली, तरी महापालिका अधिकारी तिकडे फिरकले नसल्याचे तक्रार स्थानिक करत आहेत.

उद्यान सताड उघडे
उद्यान ठराविक वेळेत बंद नसल्याने दिवसभर तरुणांचा गोंधळ सुरू असतो. देखभालीअभावी हे उद्यान बंद करण्याची मागणी होत आहे. दुसरीकडे सुरक्षारक्षक नसल्याने रात्री मद्यपी धिंगाणा करतात. वारंवार तक्रार करूनही आपल्याला कुणीही वाली नसल्याची भावना नागरिकांमध्ये दृढ होत आहे.

उद्यानात सर्वत्र प्रचंड अस्वच्छता
उद्यानाची झाडांच्या फांद्या आणि पालापाचोळा उचलण्यास सफाई कर्मचारी फिरकत नसल्याने सर्वत्र प्रचंड अस्वच्छता पसरली आहे. ‘वॉकिंग ट्रॅक’वर पालापाचोळ्याचे ढीग पडलेले असल्याने चालणे कठीण झाले आहे. मोरवाडी परिसरात श्रद्धा हेरिटेजच्या युनिट ‘ए’च्या ७ इमारती, ‘बी’च्या २ इमारती, रेणुका गुलमोहर फेज १च्या ७ इमारती आणि फेज २ च्या १० इमारती असून ५०० सदनिकाधारक आहेत. या सोसायट्यांच्या शेजारीच महालक्ष्मी हाईट्स, लाइफ स्टाइल, सिटीवन मॉल आहेत. त्यांचे कर्मचारी दुपारच्या वेळेत जेवणासाठी येतात आणि कचरा करून जातात. आपण केलेला कचरा उचलण्याची तसदी ही मंडळी घेताना दिसून येत नाही. त्यामुळे, उद्यानातील बेजबाबदार कारभाराचा फटका स्थानिकांना बसत आहे.

पालापाचोळा कुणी उचलायचा ?
या भागातील रस्त्याच्या कडेला असंख्य ठिकाणी पालापाचोळा आणि फांद्या पडलेल्या दिसून येत असतात. या संदर्भात तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने या परिसरातील रहिवाशांची अवस्था रस्त्यावरील ‘पालापाचोळ्या’सारखीच झाली आहे. शहरातील आरोग्य अबाधित राखण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाची आहे. मात्र, बारीकसारीक कचरा संकलन करण्याचा मूळ उद्देश फोल ठरला आहे. त्याने, पालापाचोळा कुणी उचलायचा ?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.


‘‘या उद्यानातील भिंत पडल्याचा मोठा आवाज आला. थोडक्यात खेळणारी मुले बचावली, मद्यपींचा भिंतीवर धिंगाणा होत असल्याने हा प्रकार घडला आहे.सगळीकडे दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला असतो.
- शशांक कटके

‘‘मोरवाडीतील उद्यानाची सीमाभिंत कोसळल्यामुळे मुले असुरक्षित झाली आहेत. उद्यानाची दुरवस्था पाहता लहान मुलांना खेळणे मुश्कील झाले आहे. महापालिकेने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
- बंडू चौधरी

शेजारील झोपडपट्टीतील मुले सकाळपासूनच ‘‘उद्यानात क्रिकेट खेळण्यास येतात. दुपारी आवाजामुळे ज्येष्ठांना त्रास सहन करावा लागत आहे. ’’
- विनायक शिंदे


‘‘उद्यानाचा ताबा आमच्याकडे असण्याबाबत मी साशंक आहे. याबाबत स्थानिकांच्या तक्रारी प्राप्त आहेत. लवकरच दुरुस्ती करण्यात येईल.’’
- राजेश वसावे, उद्यान अधिक्षक

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.