जवाहरलाल नेहरूंपासून नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत सर्वच पंतप्रधानांनी ज्यांच्या शिल्पकलेचा मुक्तकंठाने गौरव केला, असे शिल्पकार म्हणजे राम सुतार. महाराष्ट्र सरकारने प्रतिष्ठेचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर करून त्यांचा यथार्थ गौरव केला आहे. राम सुतार यांनी गेल्याच महिन्यात, म्हणजे १९ फेब्रुवारी रोजी वयाची शंभरी पूर्ण केली. पण शिल्प घडविण्याचा त्यांचा उत्साह मात्र तसूभरही कमी झालेला नाही. जबरदस्त स्मरणशक्ती, कल्पकतेला क्रियाशीलतेची आणि उत्साहाची जोड देऊन सतत कार्यमग्न राहण्याचा ध्यास घेतलेले सुतार न चुकता पुतळ्यांच्या `आर्टवर्क’साठी महत्त्वाची अशी मातीची शिल्पे साकारण्यात गढून गेलेले असतात.
वास्तववादी शिल्पकलेत सिद्धहस्त असलेले सुतार यांचा कांस्य शिल्पकलेत हातखंडा आहे. सुतार वर्तमानात जगतात. आयुष्यात मागचा विचार करुन दुःखी व्हायचे नाही आणि भविष्याची स्वप्नेही रंगवायची नाही. हाती असलेले काम गंभीरपणे करीत पुढे चालत राहिल्याने नवनवे टप्पे गाठता येतात, असे त्यांचे जगण्याचे साधे तत्त्वज्ञान आहे. या वयातही त्यांचा अदम्य उत्साह तरुण पिढीला प्रेरणा देणारा आहे. त्यांना असलेली भव्यतेची ओढ केवळ पुतळ्यांच्या आकारापुरती सीमित नाही. त्यांनी आपल्या जीवनालाही उत्तम आकार दिला. कलाकौशल्य, जिद्द, सातत्य आणि उत्साह ही गुणसंपदा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा भाग बनली. म्हणूनच या शतकवीराचा जयजयकार करणे ही खरोखर आनंदाची आणि अभिमानाची बाब.
राम वानजी सुतार यांचा जन्म धुळे जिल्ह्यातील गोंदूर गावातील. त्यांचे वडील सुतारकाम, लोहारकाम करायचे. बैलगाडीची बांधणी आणि घरबांधणीसारखी कामे करताना स्थापत्य, वास्तुशास्त्र चित्रकला, मूर्तीकलांसारख्या विविध कलांच्या नकळत संपर्कात आलेल्या राम सुतारांनी १९४७मध्ये एका आखाड्यासाठी शरीरसौष्ठवाचे महत्त्व सांगणारी मूर्ती बनविली. जे.जे. स्कूलमधून सुतारांनी पाच वर्षांचा अभ्यासक्रम चार वर्षांमध्ये सुवर्णपदकासह पूर्ण केला. किंग सर्कलपासून माटुंगा, दादर, व्हीटीपर्यंतचा प्रवास, गणेशोत्सवाच्या मोसमात मुंबईतील गणपतींच्या कारखान्यांमध्ये करमरकर आणि म्हात्रे यांच्याकडे केलेली कामे सुतारांच्या रम्य स्मृतींचा भाग आहे.
भारतीय पुरातत्व विभागात नोकरी करताना १९५४ ते १९५८ या काळात अजिंठा आणि वेरुळ लेण्यांमधील अवयव तुटलेल्या आणि भेगा पडलेल्या मूर्तींची दुरुस्तीसह पुनर्स्थापना करताना मोठमोठ्या आणि उत्तुंग शिल्पकृती घडविण्याची त्यांची इच्छा बळावली. दिल्लीच्या प्रगती मैदानात कृषी मेळाव्याच्या प्रवेशद्वारासाठी दोन पुतळे घडविण्याचे काम मिळाल्यानंतर त्यांनी दिल्लीत ‘मुक्त शिल्पकार’ म्हणून काम करण्याचे ठरविले. तेव्हापासून आजतागायत ६६ वर्षे राजधानी दिल्ली हेच त्यांचे कार्यक्षेत्र राहिले आहे. चंबळच्या गांधी सागर धरणापाशी घडविलेले प्रतीकात्मक स्मारक ही राम सुतार यांची पहिली मोठी शिल्पकृती ठरली.
चंबळच्या धरणाचे उद्घाटन करणाऱ्या नेहरुंना ती मूर्ती खूप आवडली. चंबळच्या धरणाप्रमाणेच भाक्रा नांगल धरणाचे काम करणाऱ्या लोकांचे स्मारक व्हावे,अशी इच्छा नेहरुंनी व्यक्त केली. त्यांना अपेक्षित असलेल्या पन्नास फूट उंचीच्या स्मारकाच्या सुतारांच्या डिझाईनला मंजुरी मिळूनही त्यात असंख्य अडथळे निर्माण झाले. गुजरातमध्ये सरदार सरोवर येथे सरदार पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा साकारण्यात त्यांच्या शिल्पकृतीची आणि कल्पकतेची कसोटी लागली. पाचशे फूटांच्या वर पुतळ्याची उंची हवी, असा निर्णय झाल्यानंतर सुतारांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. पटेल यांचा ब्राँझचा भव्य पुतळा उभारण्याचे अवघड आव्हान चीनमध्ये असलेल्या फौंड्रीच्या मदतीने चार वर्षात पूर्ण करण्यात आले. विविध भागांमध्ये कास्टिंग केलेल्या पुतळ्याची पूर्वनियोजित पद्धतीने होणाऱ्या जुळणीची पाहणी सुतार यांनी वयाच्या ९४ व्या वर्षी प्रत्यक्ष उभे राहून केली आणि जगातील सर्वात उंच पुतळा घडविण्याचा मान मिळविला.
दिल्लीच्या रफी मार्गावरील पंडित गोविंद वल्लभ पंत यांचा १० फूट उंचीचा ब्राँझ पुतळा राम सुतार यांच्या कौशल्याची साक्ष पटविणारा आहे. राम सुतार यांनी गेल्या ६६ वर्षांमध्ये दोनशेहून अधिक स्मारकवजा शिल्पकृती घडविल्या आहेत. सोळा फूट उंच महात्मा गांधींच्या ध्यानस्थ बसलेल्या अवस्थेतील भव्य मूर्तीसह संसद भवनाच्या परिसरात राम सुतारांच्या हातून घडलेले पं. नेहरु, सरदार पटेल, इंदिरा गांधी, मौलाना आझाद, जयप्रकाश नारायण, गोविंद वल्लभ पंत, रफी अहमद किडवाई आदींचे पुतळे उभे आहेत.
प्रत्येक राज्यात आणि प्रत्येक विमानतळावर त्यांच्या शिल्पकृतीचा परिचय घडतो. त्यांनी घडविलेला महात्मा गांधींचा पुतळा फ्रान्स, इटली, अर्जेंटिना, बार्बाडोस, रशिया, ब्रिटन, मलेशियासह दीडशेहून अधिक देशांमध्ये स्थापन करण्यात आला आहे. अमेरिका, युरोप, अनेक आशियाई देशांसह भारताच्या विविध भागांमध्ये स्थापित पुतळे त्यांच्या कार्याची साक्ष देतात. इंडिया गेट परिसरातील राष्ट्रीय युद्ध स्मारकामध्ये सहा ब्राँझ म्युरल्ससह राम सुतार यांचा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ लक्षवेधक ठरला आहे.अयोध्येत श्रीरामाचा भव्य पुतळा उभारण्याचे काम त्यांच्याकडे सोपविण्यात आले आहे; तसेच मुंबईच्या इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्याचे कामही त्यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. ‘उत्कट भव्य तेचि घ्यावे, मिळमिळीत अवघे टाकावे..’ याचे राम सुतार हे चालतेबोलते उदाहरण.