MP Rajani Patil : केंद्र व राज्य शासनाच्या गृह मंत्रालयाची कामगिरी असमाधानकारक; बीड जिल्ह्याचे मणिपूर होईल!
esakal March 23, 2025 03:45 AM

केज - बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून व काश्मीरमधील स्थिति विषयीच्या राज्य आणि केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाच्या असमाधानकारक कामगीरी विषयी राज्यसभेच्या सभागृहात टीका करून नाराजी व्यक्त करत काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांनी केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले.

बीड जिल्ह्यातील मस्साजोग (ता.केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा राखण्यास राज्य शासनाच्या गृहमंत्रालयाला आलेले अपयश पुन्हा उघड झाले.

या हत्या प्रकरणातील आरोपींवर वेळीच कारवाई झाली नाही, तर बीड जिल्ह्यासह महाराष्ट्राचे मणिपूर होण्यास वेळ लागणार नाही, असे एका स्थानिक शेतकऱ्याने काँग्रेसच्या सद्भावना यात्रेवेळी सांगितल्याचे सभागृहात सांगत काँग्रेसच्या रजनी पाटील यांनी शुक्रवारी केंद्र व राज्य सरकारवर हल्लाबोल केला.

राज्यसभेत मराठीतून केलेल्या दहा मिनिटांच्या भाषणात पाटील यांनी विविध मुद्द्यांवरून केंद्रावर टीकास्त्र सोडले. जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थिती सामान्य होत असल्याचे केंद्र सरकार वारंवार सांगत आहे. तर मग काश्मीरमधील सुरक्षेसाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पात ४१ हजार कोटी रुपयांची मोठी तरतूद का करावी लागली? असा प्रश्न उपस्थित केला.

मोदी सरकारने काश्मिरी पंडितांचा वापर केवळ राजकीय शस्त्र म्हणून केला आहे. त्यांना मदत न करता त्यांच्यावर चित्रपट बनवण्याचे आणि त्याबद्दल फक्त बोलण्याचे काम त्यांनी केले आहे. वर्ष-२०२५-२६ च्या अर्थसंकल्पात गृह मंत्रालयासाठी २ लाख ३३ हजार २११ कोटींची तरतूद करूनही या मंत्रालयाची कामगिरी असमाधानकारक आहे.

निमलष्करी दलात मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे आत्महत्या, मानसिक ताण, निवृत्तीआधीच राजीनामा देण्याचे प्रमाण वाढत आहे. सीआरपपीएफमध्ये नऊ टक्के मनुष्यबळ कमी आहे. या दलाच्या आधुनिकीकरणासाठी ४,०६९ कोटींची तरतूद केली आहे. परंतू गेल्या काही वर्षांत ९० टक्के अनुदानवाटप झालेले नाही.

'नारी शक्ती वंदन' चा गवगवा करणाऱ्या या सरकारच्या काळात निमलष्करी दलामध्ये महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाण फक्त चार टक्के असल्याचे सांगितले. खासदार रजनी पाटील यांना वीस मिनिटांचा वेळ बोलण्यासाठी देण्यात आला होता. परंतू पूर्वीच्या वक्त्यांचे भाषण लांबल्याने त्यांना केवळ सात-आठ मिनिटे बोलण्याची संधी मिळाली.

आपले भाषण घाईघाईने वाचताना खासदार पाटील यांना खोकल्याची जबरदस्त उबळ आली. ते पाहून ज्येष्ठ सदस्या सुधा मूर्ती यांनी भाजपच्या बाकावरून पुढे येऊन त्यांना पाण्याची बाटली दिली. घरी जाताना पाटील यांनी आभार मानल्यावर सुधा मूर्ती यांनी, 'पक्षाचा इथे काय संबंध?' अडचणीत आपणच मदत करायची असते,' असे सांगितले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.