इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेचा पहिला सामना कोलकतामधील ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात शनिवारी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात दोन्ही संघांचे नेतृत्व नवे कर्णधार करताना दिसत आहेत.
अजिंक्य रहाणेने कोलकाताचा कर्णधार म्हणून खेळताना पहिल्याच सामन्यात पहिल्या डावात छाप पाडण्यात मात्र यश मिळवले आहे. पण त्याचवेळी बंगळुरूचे फिरकीपटूही या सामन्यात चमकले आहेत. या सामन्यात कोलकाताने बंगळुरूसमोर १७५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
या सामन्यात कर्णधार रजत पाटीदारने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, सुरुवातीलाच सुयश शर्माकडून कोलकाताचा सलामीवीर क्विंटन डी कॉकचा झेल सुटला.
मात्र या जीवदानाचा डीकॉकला फायदा घेता आला नाही. त्याला पहिल्याच षटकात जोश हेजलवूडने ४ धावांवर यष्टीरक्षक जितेश शर्माच्या हातून झेलबाद केले. पण यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे सलामीवीर सुनीव नरेनसोबत भक्कम उभा राहिला.
बंगळुरूच्या गोलंदाजांवर तुटून पडत २५ चेंडूत अर्धशतकही झळकावलं. त्यामुळे संघाने १० षटकातच १०० धावांचा टप्पा ओलांडला होता. मात्र १० व्या षटकात सुनील नरेनला रसिख दार सलामने जितेशच्या हातून झेलबाद केले. नरेनने २६ चेंडूत ४४ धावांची खेळी केली.
तो बाद झाल्यानंतर पुढच्याच षटकात अजिंक्य रहाणेलाही कृणाल पांड्याने माघारी धाडले. रहाणेने ३१ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकारांसह ५६ धावा केल्या. त्याचा झेल रसिख सलामने घेतला. त्याला बाद केल्यानंतर कृणाल पांड्याने बंगळुरूला सामन्यात पुनरागमन करून दिले.
कृणालने १३ व्या षटकात वेंकटेश अय्यरला ६ धावांवर माघारी धाडले, तर १५ व्या षटकात रिंकू सिंगला १२ धावांवर त्रिफळाचीत केले. पुढच्याच षटकात धोकादायक आंद्र रसेला सुयश शर्माने त्रिफळाचीत करत कोलकाताला मोठा धक्का दिला.
तरी अंगकृष रघुवंशीने एका बाजूने झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला १९ व्या षटकात यश दयालने जितेशच्या हातून ३० धावांवर बाद केले. शेवटच्या षटकात हर्षित राणाही ५ धावांवर हेजलवूडविरुद्ध खेळताना जितेशकडेच झेल देत बाद झाला. अखेर रमणदीप ६ धावांवर आणि स्पेन्सर जॉन्सन १ धावेवर नाबाद राहिले. कोलकाताने २० षटकात ८ बाद १७४ धावा केल्या.
बंगळुरूकडून कृणाल पांड्याने सर्वोत्तम गोलंदाजी करताना ४ षटकात २९ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. तसेच जोश हेजलवूडने ३ षटकात २२ धावा देत २ विकेट्स घेतल्या. यश दयाल, रसिख दार सलाम आणि सुयश शर्मा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.