इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत रविवारी (२३ मार्च) चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स संघात सामना होणार आहे. चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियम (चेपॉक) येथे संध्याकाळी ७.३० वाजता सामना सुरू होणार आहे. या सामन्यापूर्वी केदार जाधवने शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला.
केदार जाधवने विविध पैलूंवर भाष्य केले. यात त्याने चेन्नई सुपर किंग्ससाठी यशामागील रहस्य यष्टीमागे असलेला धोनी आणि फिरकी गोलंदाज असल्याचेही म्हटले. केदार यंदा जिओस्टारसाठी मराठीतून समालोचन करत आहे.
आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी चेन्नई संघाने अनेक फिरकी गोलंदाजांना निवडले आहे, यात आर अश्विन, रवींद्र जडेजा, नूर अहमद, श्रेयस गोपाळ यांच्यासह रचीन रवींद्र आणि दीपक हुडा हे अष्टपैलू देखील फिरकी गोलंदाजी करतात.
याबाबत प्रश्न विचारल्यानंतर म्हणाला, 'चेन्नई सुपर किंग्सचा जर इतिहास पाहिला, तर फिरकी आक्रमण असणं हे खूप महत्त्वाचं ठरतं. कारण जेव्हाही चेन्नई सुपर किंग्स आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करते, तेव्हा मधल्या षटकांमध्ये त्यांचे फिरकी गोलंदाजांचं जाळ जेवढं चांगलं विनलं जातं, तेवढ्या चांगल्या प्रकारे चेन्नईला ते सामने सहज जातात.
'मधल्या षटकात गोलंदाजी करणारे फिरकीपटू आणि यष्टीमागील धोनी, हे एक चेन्नईसाठी विजय मिळवून देणारे कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे मला वाटतं धोनीला स्टम्पमागून जर सामना जिंकवायचा असेल, तर फिरकीपटू खूप महत्त्वाचे ठरतात. खास करून चेन्नईतील खेळपट्टीवर. त्यामुळे त्यांनी संघ बांधणी करताना तशी केली आहे, ज्यात अष्टपैलू खेळाडू आणि फिरकीपटू आहेत.'
याशिवाय त्याने असेही म्हटले की ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉनवे ही यशस्वी जोडी चेन्नईकडे आहे. त्यानंतर राहुल त्रिपाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. त्याने गेल्यावर्षी सनरायझर्स हैदराबादकडून चांगली फलंदाजी केली आहे.
सुरेश रैनानंतर तिसऱ्या क्रमांकासाठी अद्याप चेन्नईला भक्कम पर्याय मिळालेला नाही. राहुल त्रिपाठी कोणत्याही गोलंदाजी आक्रमणाविरुद्ध खेळाडू शकतो. तसेच त्याने ऋतुराज, कॉनवे आणि राहुल यांची कामगिरी महत्त्वाची असल्याचेही म्हटले.
पण याचबरोबर रचिन रवींद्र देखील चांगल्या फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे त्यालाही खेळवायला हवे का, यावर केदार म्हणाला, 'रचिनकडे जी प्रतिभा आहे आणि ज्या फॉर्ममध्ये तो आहे, ते पाहाता त्याला खेळवायला तर हवे. त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी द्यायला हवी. पण ऋतुराज आणि कॉनवेच्या जोडीला यश मिळाले आहे. त्यामुळे कदाचीत राहुल त्रिपाठी आणि रचिन रवींद्र तीन किंवा चार क्रमांकावर खेळू शकतात.'
'मला वाटतं की रचिन असा खेळाडू आहे, ज्याची प्रतिभा पाहाता फलंदाजी क्रमवारीने त्याला फरक पडणार नाही. हा हंगाम त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरेल. कारण मागच्या हंगामात त्याला तितकी कामिगिरी बजावता आली नव्हती. त्यामुळे आयपीएलमध्ये त्याला ठसा उमटवायचा असेल, तर त्याला यंदाचा हंगाम गाजवावा लागणार आहे.
याशिवाय हा अखेरचा आयपीएल हंगाम असणार का याबाबत केदार म्हणाला, धोनी निर्णय अनपेक्षीत असतात, त्यामुळे त्याच्यासाठी हा शेवटचा हंगाम असेल की नाही, हे सांगता येत नाही.
त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स आवडते संघ असल्याचेही त्याने सांगितले.
दोन चेंडूंचा नियमदवाचा परिणाम कमी करण्यासाठी यंदा दुसऱ्या डावात १० व्या षटकानंतर गोलंदाजी करणाऱ्या संघाला दुसरा सुका चेंडू देण्याचा नियम लागू करण्यात आला आहे. याबाबात केदार म्हणाला, हा नियम खूप उत्सुकता निर्माण करत आहे. कारण जेव्हा दुसऱ्या संघाचे फलंदाज असतात त्यांनी मधल्या षटकात चेंडू जिथे स्विंग होत नाही, त्यावर मोठे फटके खेळण्यासाठी भर दिलेला असतो.
पण जर आता ११ व्या षटकात नवीन चेंडू घेणार असं म्हटलं तर तिथे त्यांना स्विंगचाही सामना करावा लागेल. ही षटके अशीही असतात, जिथे फिरकी गोलंदाज विकेट काढून देतात किंवा संघ एखादा फलंदाज अशा षटकांसाठी राखून ठेवतात. पण आता गोलंदाजांना फायदा मिळणार आहे. याशिवाय यावेळी ३०० धावाही पार होऊ शकतात, असंही केदार म्हणाला आहे.