IPL 2025 Points Table: चेन्नई सुपर किंग्सने पहिला सामना जिंकला, पण गुणतालिकेत अव्वल स्थान मिळालं नाही; कारण..
GH News March 24, 2025 08:12 PM

आयपीएल 2025 स्पर्धेतील प्रत्येक सामन्याच्या निकालानंतर त्याचा परिणाम गुणतालिकेवर दिसत आहे. या स्पर्धेत तीन सामने पार पडले असून त्यापैकी तीन संघांनी विजय, तर तीन संघांच्या पदरी निराशा पडली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांनी विजय मिळवला आहे. तर मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांना पहिल्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. खरं तर विजयी झालेल्या प्रत्येक संघाला प्रत्येकी दोन गुण मिळाले आहेत. पण गुणतालिकेत असं असूनही फरक दिसून येत आहे. गुणतालिकेत पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबाद हा संघ अव्वल स्थानी आहे. सनरायझर्स हैदराबादने एकच सामना जिंकला असला तरी नेट रनरेटमध्ये जबरदस्त फायदा झाला आहे. हैदराबादने राजस्थान रॉयल्सला 44 धावांनी पराभूत केलं आहे. त्यामुळे नेट रनरेट हा 2.200 आहे आणि अव्वल स्थानी विराजमान आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने कोलकाता नाईट रायडर्सचा पहिल्या सामन्यात पराभव केला. पण नेट रनरेट हा हैदराबादच्या तुलनेत कमी आहे. आरसीबीने कोलकात्याला 7 विकेट आणि 22 चेंडू राखून पराभूत केलं. त्यामुळे पदरी 2 गुण पडले आणि नेट रनरेट हा 2.137 इतका आहे. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. तर चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सला 4 विकेट आणि पाच चेंडू राखून पराभूत केलं. विजय मिळाला असला तरी नेट रनरेट काही झाला नाही. चेन्नई सुपर किंग्सचा नेट रनरेट 2 गुणांसह 0.493 इतका आहे. त्यामुळे तिसऱ्या स्थानावर आहे.

आयपीएलचा चौथा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होणार आहे. या सामन्यानंतर गुणतालिकेत फरक पडणार यात काही शंका नाही. जर हा सामना मोठ्या फरकाने जिंकण्यात दोन्हीपैकी एका संघाला यश आलं तर नक्कीच गुणतालिकेत उलथापालथ होईल. पहिल्या फेरीतील पाचवा आणि शेवटचा सामना गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात होणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.