पडद्यामागची चित्तरकथा
esakal March 23, 2025 11:45 AM

सुलभा तेरणीकर - मयूरपंखी सिनेमा

सिनेमा उद्योगाचा वृक्ष पानोपानी बहरू लागला. नाटकाच्या मंचामागे संसार असतो तसा पडद्यामागे असलेल्या प्रपंचात हजारो हात राबू लागले. चित्रकर्मींची दमदार फळी उभी राहिली. मग त्यातूनच कुणी स्वतःचा वेगळा संसार थाटू लागला, कुणी भव्य स्टुडिओ, तर कुणी आगळावेगळा प्रयोग. कोल्हापूर, पुणे, मुंबईच्या आटपाटनगरातल्या कहाण्यांना अंतच नव्हता... सरदार चंदूलाल शहांची कहाणी चित्तरकथाच होती... थिएटरभोवतीचा बाजार मात्र गरम होता...

कोल्हापूरचे कलापूर म्हणून अस्तित्व हे सिनेमासारखी कला-माध्यम किंवा उद्योग म्हणून रुजल्याने अगदी ठळक झाली. बाबूराव पेंटर यांच्यासारखे कलामहर्षी तर त्यांची रंगशाळा आणि कुंचले यांचे सुभग दर्शन घडवू लागले. पुढे ‘प्रभात’नेही हरहुन्नरी लोकांचा मोठा मेळावा जमवला. त्यातून चित्रपटासाठी प्रत्येक खात्यात रुची घेणाऱ्या, कॅमेऱ्यात डोकावू पाहणाऱ्या होतकरू युवकाला आपणही सिनेमासाठी काम करावं हे वाटलं तर नवल ते काय? राजा पंडित यांनी स्वतःची संस्था काढली. ‘प्रभा चित्र’ साल होतं १९३८. ‘हंस पिक्चर्स’शी बोलून पंडितांनी धाडसानं एक कल्पना मांडली. ती म्हणजे फक्त लहान मुलामुलींना घेऊन चित्रपट काढायचा. बाबूराव पेंढारकर, मा. विनायक यांना ही कल्पना आवडली. त्यांनी सर्वतोपरी साह्य करण्याचे कबूल केले. विषय ठरला ‘ध्रुव!’ राजा पंडित यांनी खूप खटपटी करून मुलामुलींची जमवाजमव केली. पंधरा वर्षे वयाची टीम ठरली.

ध्रुव ठरले बालकराम. वय सात. नारद इंदू मिस्त्री. वय दहा. ध्रुवाची आई शांता चौगुले. वय बारा. ही मुलगी मेकअप सहाय्यक नानीबाईंची मुलगी होती. उत्तानपाद राजा - गजानन लोळगे. वय १५. विनोदी नट बाबू महाडिक वय १३. दासी-विमल मिस्त्री वय आठ. अनू इनामदार वय नऊ. इंद्र टेंगशे वय १२. भगवान विष्णूंचे काम करणारा एक देखणा चुणचुणीत मुलगा होता, त्याचे वडील मात्र परवानगी देत नव्हते. राजा पंडित यांनी हरिहर विद्यालयाच्या हेडमास्तरांना गाठले. त्यांना मुलगा ठाऊक होता.

त्यांनी अट घातली की मुलाला शाळेतून घेऊन जायचे आणि संध्याकाळी सव्वापाचला शाळेत सोडायचे. अर्थात अट मान्य झाली. वामन मांडरे नावाचा १२ वर्षे वयाचा मुलगा भगवान विष्णू झाला. पुढे चंद्रकांत-सूर्यकांत ही मराठी चित्रसृष्टीला भावंडांची देखणी जोडी मिळाली, हा इतिहास सर्वश्रुत आहे. गोपाळ मांडरे चंद्रकांत, तर वामन म्हणजे सूर्यकांत. ही हकीकत खुद्द सूर्यकांत यांनी लिहून ठेवली आहे. बालकलाकारांना घेऊन पहिला चित्रपट काढायचा मान कोल्हापूरला मिळाला हे ते अभिमानाने नमूद करतात.

पुण्यात दादासाहेब तोरणे ‘सरस्वती सिनेटोन’च्या मराठी लोकांचा भक्कम आधार वाटावा अशा स्टुडिओत दमदार चित्रनिर्मिती करीत होते. संपूर्ण देखरेख, तांत्रिक बाजू, ध्वनी, कथा, दिग्दर्शन यावर लक्ष ठेवून असत. १९३३ मध्ये त्यांनी ‘भक्त प्रल्हाद’ची निर्मिती केली. त्यात ट्रिकसीनने चाळीस फूट उंचीचा नरसिंह स्पेशल लेन्सचा वापर करून पडद्यावर दाखवला तेव्हा प्रेक्षकांचेही डोळे विस्फारले आणि सिनेसृष्टीतही मोठी खळबळ झाली. अवघे सात वर्षांचे प्रल्हाद झाले होते भालचंद्र नीळकंठ कर्वे ऊर्फ मोहन कर्वे. ग्वाल्हेर घराण्याचे ख्यालगायक म्हणून त्यांनी मोठा लौकिक मिळवला.

१९३४ मध्ये दादासाहेब तोरणे यांनी ‘छत्रपती संभाजी’ या चित्रपटाची निर्मिती केली. कथा, पटकथा, संवाद, गीते द. का. काणे यांची होती. दिग्दर्शक होते पार्श्वनाथ आळतेकर. छत्रपती संभाजी महाराज समाधीतून बाहेर येतात आणि घोडदौड सुरू होते अशी अभिनव सुरुवात होते. शेवटी कोल्हापूरचे राजाराम महाराज राजांच्या समाधीला हार घालतात, असे दृश्य आहे.

चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांचे केलेले हाल पाहून त्या वेळचे प्रेक्षक इतके दुःखी, व्यथित झाले, की भावनेच्या भरात प्रक्षुब्ध होऊन त्यांनी खेळ बंद पाडला. दादासाहेब तोरणे यांनी प्रेक्षकांची भावना लक्षात घेऊन प्रतीकात्मक असा शेवट दाखवला. सेन्सॉरने बरीचशी दृश्यं काढून टाकायला लावली आणि एक दमदार ऐतिहासिक महत्त्वाचा चित्रपट कालौघात हरवला. दादासाहेब तोरणे यांच्या कुटुंबीयांनी खुद्द दादासाहेब तोरणे वढू, तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीला हार अर्पण करीत आहेत, असे दृश्य चित्रफितीच्या माध्यमात जतन केलं आहे. बाल प्रल्हाद झालेल्या गायक मोहनराव कर्वे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. १३ एप्रिलला दादासाहेब तोरणे यांची १३५वी जयंती आहे; पण काळाच्या पडद्यातून काही अक्षरे धूसर दिसली तरी पाहावीत, असं वाटतं.

मुंबईच्या मयनगरीत चित्रपटनिर्मितीच्या रोज एक कथा अवतरत होत्या. एक कथा जामनगरच्या ४ एप्रिल १९९८ मध्ये जन्मलेल्या चंदूलाल शहा यांच्याशी जोडलेली आहे. जामनगरच्या दरबारात करणाऱ्या जेसंगभाईंनी आपल्या मुलांना व्यापार-उद्योगासाठी मुंबईला पाठवलं. लहानसहान कामं करताना चंदूलाल वीसच्या दशकात उधाण आलेल्या मूकपटाच्या निर्मितीकडे आणि लोकप्रियतेकडे आकर्षित झाले. कॉटन व्यापार आणि स्टॉक एक्स्चेंजची नोकरी करता करता चंदूलालनी सिनेमाचे तंत्र मंत्र आत्मसात केले. १९२५ ते ३० पर्यंत अनेक मूकपट केले. अनेक संस्थांसाठी केले आणि अखेर दादर (पूर्व) भागात १९२९ मध्ये स्वतःची रणजित फिल्म कंपनी स्थापन केली. कथा, पटकथा, संवाद, निर्मिती ते लोकप्रिय चित्रपटाची यशस्वी वाटचाल हे सर्व कसब त्यांच्या ठायी होते.

१९३३ मध्ये ‘रणजित मुव्ही टोन’ असे नाव धारण करून चंदूलाल शहा हे चित्रपट उद्योगातील एक लब्ध प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व झाले. त्यांची जीवनशैली गाड्यांचा ताफा, उमदे घोडे, रेसचा शौक हे तर होतंच; पण चित्रसृष्टीत मोठा दबदबा होता.

रणजीतमध्ये आकाशात नसतील एवढे तारे-तारका आहेत असे म्हटले जाई ते शब्दशः खरे होते. सातशेच्या वर माणसं काम करीत असत. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी कलकत्त्यातले कलावंत मुंबईत येऊ लागले. त्यांच्यासाठी मुंबईचे दरवाजे चंदूलाल शहांनी खुले केले. कलकत्त्यात गेलेल्या पृथ्वीराज कपूरना चंदूलाल शहाच मुंबईत घेऊन आले. तिमिर बरनचे सहाय्यक खेमचंद प्रकाशनाही त्यांनीच आणलं. खुद्द के. एल. सैगल मुंबईत त्यांच्यामुळेच आले.

असं म्हणतात सैगलसाठी स्वतंत्र रेल्वेचा डबा शृंगारला होता आणि मुंबईत त्यांच्या स्वागताची जंगी तयारी केली होती. पण सैगल आपल्याला स्वतंत्र बोगीत करमेना म्हणून इतरेजनांच्या प्रवासी डब्यातून आले. काहीही असो. रणजीतच्या कलावंतांची यादी पाहिली की त्यांना सेठ चंदूलाल किंवा सरदार ही उपाधी कलावंतांनी का दिली त्याचा प्रत्यय येतो.

आधीच्या पिढीच्या माधुरी, सुलोचना, बिलिमोरिया बंधू, ईश्वरलाल, चार्ली, दीक्षित, मोतीलाल हे कलाकार उस्ताद झेंडे खाँ, ज्ञानदत्त, बुलो सी रानी असे संगीतकार तसेच जयंत देसाई, नानूभाई वकील, मणिलाल व्यास, नंदलाल जसवंतलालसारखे दिग्दर्शक ही चंदूलाल शहा यांची देणगी आहे.

जामनगरचे महाराजा आणि क्रिकेटपटू रणजितसिंहजी यांचे देखणे रुबाबदार चित्र ‘रणजीत’चे बोधचिन्ह झाले. महाराजांचा स्नेह आणि कृतज्ञता याचे प्रतीक झाले.

‘गुणसुंदरी’ हा त्यांचा मूकपट आणि नंतर बोलपट विशेष गाजला. प्रत्येक पुरुषाला गृहिणी हवी असते आणि एक प्रेयसी म्हणूनही! या कल्पनेवर आधारित काहीशी हलकीफुलकी कथा होती. फॅशनेबल स्त्री म्हणून ती सहधर्मचारिणीच येते, असे काहीसे कथानक होते. अर्थात प्रेक्षकांच्या त्यावर उड्या पडल्या. चंदूलाल शहांची आणि रणजीत मुव्हीटोनची कहाणी गौहर मामजीवाले या नावाशिवाय पूर्ण होत नाही.

१९१०मध्ये पाकिस्तानातल्या क्वेट्टा या गावी जन्मलेल्या गौहरच्या आईची म्हणजे पुतळीबाईची नाटक कंपनी होती. बालपण विंगेत उभी राहून अभिनय बघण्यात, नाटक पाहण्यात गेलं. कलकत्त्याहून लाहोर मुक्कामी कंपनी असताना आगीच्या दुर्घटनेत खूप नुकसान झालं. चौदा वर्षांची गौहर आणि पुतळीबाई मुंबईत आल्या. मुलीनं नाटकात जाऊ नये, असं पुतळीबाईंना वाटलं तरी अखेर दोघी मूकपटात कामं करू लागल्या.

रणजीतच्या बोलपटात त्यांची जोडी देखणे नट डी. बिलिमोरियांशी जुळली. ‘सती सावित्री’, ‘विश्वमोहिनी’ या तीसच्या दशकातल्या रणजीतच्या चित्रपटाच्या नायिका होत्या. ‘रणजीत’चे चित्रपट सफल होत होते. लवकर त्या ‘रणजीत’च्या कंपनीच्या कामातही लक्ष घालू लागल्या. रणजीतचे नाव अस्मानात गेले. त्यात गौहरचा सहभाग होता.

चंदूलालदेखील हात लावेल तिथे सोने या नशिबाचे होते. अर्थात ही कथा पुढे सुरू राहिली. पुढे चंदूलाल शहा आणि गौहर यांची प्रीतीकथा लोकविलक्षण ठरली. आणि रणजीत मुव्हीटोन ही चित्रपट निर्मितीची वल्लरी वाढत राहिली. त्याला नवी पालवी फुटत राहिली. ‘भूतिया महल’, ‘बॅरिस्टर की वाईफ’, ‘भोला शिका’, ‘परदेशी पंखा’, ‘प्रोफेसर वामन’, ‘बिल्ली’, ‘मिट्टी का पुतला’ अशा नावाचे चित्रपट काळाच्या ओघात हरवले. ई. बिलिमोरिया, डी. बिलिमोरिया या देखण्या नटांची झलकही नाही; तरीही काही सापडते, गवसते ते...

(लेखिका ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक आहेत.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.