पुणे: राजकारण काय घडेल याचा काही नेम नसतो. गेल्या काही महिन्यांमध्ये राजकीय वर्तुळामध्ये अनेक घडामोडी घडल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची काल (शनिवारी) पुण्यात भेट झाली. या दोघा नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. यानंतर अजित पवारांनी या भेटीबाबत स्पष्टपणे सांगितलं. मात्र, राजकीय वर्तुळात आता शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का? अशी चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि नेते जे गेल्या काही महिन्यांपासून नाराज असल्याच्या चर्चा आहेत ते छगन भुजबळ यांनी याबाबत जळगावात चांगले ज्योतिषी आहेत. त्यांनाच या संदर्भात विचारतो, असं उत्तर छगन भुजबळ यांनी दिलं आहे.
आमदार छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) सध्या जळगाव दौऱ्यावर आहे. समता परिषदेचा मेळाव्यातून त्यांनी राज्यात शक्तिप्रदर्शन केलं. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातून डावलल्यानं भुजबळ नाराज आहेत. समता परिषदेतून त्यांनी राज्यासह राष्ट्रीय पातळीवर दौऱ्याचे नियोजन केले आहे. मंत्रिपद न मिळाल्याने डावलले गेलेले छगन भुजबळ हे गेल्या काही दिवसांपासून पक्षातील कोणाहीपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जास्त संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यांनी पुन्हा शरद पवार आणि अजित पवार यांच्या एकत्र येण्यावर भाष्य केलं आहे. छगन भुजबळांना काका-पुतण्या एकत्र येण्याबाबत प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणाले, संदर्भात पंचांग वगैरे बघतो. मी आता जळगावमध्ये आलो आहे. इथं चांगले ज्योतिषी आहेत. त्यांना विचारतो, असं होईल का? असा प्रश्न करतो, असे भुजबळ यांनी म्हटलं आहे.
अजितदादा आणि जयंत पाटील यांच्या बंद चर्चेवरही छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील आणि माझीही अनेकदा चर्चा होते. विधानसभेत ते माझ्या बाजूलाच बसतात. आम्ही चर्चा करतो. आव्हाडही माझ्या बाजूलाच असतात. आम्ही अनेक विषयांवर चर्चा करतो. अजितदादा आणि जयंत पाटील यांनी चर्चा केली तर काय बिघडलं? आम्ही शत्रू नाहीत आम्हाला धडा मिळालेला आहे. ते आमच्या विरोधी पक्षात आहेत. त्यांची मते वेगळी आहेत, आमची वेगळी आहे, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये जयंत पाटील यांची भेट झाली. त्यात ऊसशेतीमध्ये एआय तंत्रज्ञानाच्या वापरासंबंधी चर्चा झाली. तिथे अन्य काहीजणही उपस्थित होते. या भेटीत राजकीय चर्चा काहीही झाली नाही. या भेटीचे चुकीचे अर्थ काढू नयेत असं अजित पवारांनी म्हटलं. मात्र, या बैठकीच्या निमित्ताने दोघे जवळ येत असल्याचे स्पष्ट संकेत दिसत आहेत.
अर्थसंकल्पात कृषी उत्पादन वाढीसाठी केलेल्या तरतुदीसंदर्भात त्यांचं म्हणणं जाणून घेण्यासाठी ही बैठक घेतल्याचं अजित पवार म्हणाले आहेत. त्याचबरोबर माध्यमांनी काय बातम्या लावाव्यात हा त्यांचा प्रश्न आहे. पण वस्तुस्थिती पाहुन बातम्या द्या. आमची व्हीएसआयची बैठक होती. त्यासाठी मी आणि जयंत पाटील एकत्र आलो होतो, आजच्या व्हीएसआयच्या बैठकीत एआयचा महत्वाचा विषय होता. एआयचा फायदा होतो आहे. एआयचा वापर करणे काळाची गरज आहे. एआयचा वापर करुन ऊसाचे उत्पादन वाढले आहे. आम्ही त्याचा वापर फळबागा आणि इतर पिकांसाठी देखाल करणार आहोत.आजची नेहमीप्रमाणे आमची बैठक होती. या नियामक मंडळात जयंत पाटलांसह अनेक जण आहेत. त्यांनी काही मिटिंग घेतल्या होत्या. एआयचा वापर करून कृषी क्षेत्रातील उत्पादन वाढवण्यासंदर्भात मी अर्थसंकल्पात सांगितलं होतं. त्याकरता 500 कोटींची तरतूद केल्याचंही जाहीर केलं होतं. यावर जयंत पाटलांचं म्हणणं जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो. दोन बैठकांमध्ये थोडावेळ होता, म्हणून ती बैठक घेतली. आम्ही नेहमीप्रमाणे जनरल बॉडीला, नियामक मंडळाला येत असतो, काही कमिटीला येत असतो. कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करून कृषी उत्पादन कसं वाढेल, यासंदर्भातच आज चर्चा झाली. यातून टनेज कसं वाढेल यावर चर्चा झाली. प्रायोगिक तत्वावर केलेल्या कामामुळे टनेज वाढल्याचं लक्षात आलंय. सोयाबीन, कापूससारख्या पिकांसाठी एआयचा वापर करणं काळाची गरज आहे, या बाबी कृषी खात्याने आणि सरकारने मनावर घेतलं आहे, अशी माहिती देखील अजित पवारांनी यावेळी दिली आहे.
अधिक पाहा..