मुलींनी स्पर्शाबाबत जागरूक रहावे
esakal March 23, 2025 10:45 PM

52866

मुलींनी स्पर्शाबाबत जागरूक रहावे

डॉ. शुभांगी जोशी ः भंडारी हायस्कूलमध्ये मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २३ ः आज महिला व लहान मुलींवर अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. स्वतःची सुरक्षितता ठेवणे ही आपलीच जबाबदारी आहे. मुलींनी त्यांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींकडून होणाऱ्या स्पर्शाबाबत जागरूक राहिले पाहिजे, कोणता स्पर्श चांगला कोणता स्पर्श वाईट हे मुलींनी जाणून घेणे व वेळीच ओळखणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन डॉ. शुभांगी जोशी यांनी येथे केले.
येथील भंडारी ए. सो. हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रशाळेतील सखी सावित्री समितीतर्फे ‘सशक्त नारी सशक्त समाज’ विषयावर विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले होते. व्यासपीठावर डॉ. गार्गी ओरसकर, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वामन खोत, संस्थेचे लोकल कमिटीचे खजिनदार जॉन नरोना, मुख्याध्यापक एच. बी. तिवले, पर्यवेक्षक आर. डी. बनसोडे, सहाय्यक शिक्षिका सरोज बांदेकर, पी. जी. मेस्त्री, जे. व्ही. रेवणकर आदी उपस्थित होते.
डॉ. जोशी यांनी ‘‘आपले शरीर ही आपली संपत्ती आहे, शरीरावर कशाही पद्धतीने स्पर्श करण्याचा अधिकारी कोणालाही नाही. एखाद्या स्पर्शामुळे आनंद वाटत असेल, छान वाटत असेल तर तो चांगला स्पर्श असतो, तर ज्या स्पर्शाने आपल्याला राग येतो, घृणा वाटते, रडू येते असा स्पर्श वाईट असतो. हे स्पर्श मुलींनी ओळखणे गरजेचे आहे,’’ असेही त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. ओरसकर यांनी मुलींच्या समस्या तसेच आहार या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. सौ. बांदेकर यांनी प्रास्ताविक केले. मुख्याध्यापक श्री. तिवले यांनी स्वागत केले. श्रीमती मेस्त्री यांनी आभार मानले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.