चंद्रपूर : मागील महिनाभरापासून पोलिसांना चकमा देणारा चिल्लर प्रशांत कोरटकरला अखेर कोल्हापूर पोलिसांनी सोमवारी (ता. २४) तेलंगणातून अटक केली आहे. ‘कोरटकरचा चंद्रपुरात पाहुणचार’ हे वृत्त सकाळमध्ये प्रकाशित झाले होते.
त्यानंतर कोल्हापूर पोलिस चंद्रपुरात दाखल झाले. येथूनच कोरटकर तेलंगणात कारने पळून गेल्याची महत्त्वपूर्ण टीप कोल्हापूर पोलिसांना मिळाली व या टीपनंतर कोल्हापूर पोलिसांनी कोरटकरला तेलंगणात पकडले.
नागपूर येथील प्रशांत कोरटकर याने छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी गरळ ओकत इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. यानंतर कोरटकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अटकेसाठी पोलिस त्याच्या मागावर होते. मात्र, तो महिनाभरापासून पोलिसांना चकमा देत होता. न्यायालयाने अटकपूर्व जामीन दिला, तेव्हा कोरटकर हा चंद्रपुरातील हॉटेल सिद्धार्थ प्रीमियर येथे मुक्कामी होता.
११ मार्च रोजी सायंकाळी १०.३० वाजता त्याने हॉटेलात प्रवेश केला. ऑनलाईन क्रिकेट सट्टाचे काम करणारा बुकी धीरज चौधरी याने त्याची हॉटेलातील सर्व व्यवस्था केली होती. यावेळी कोरटकर याच्यासोबत प्रशिक पडवेकर हादेखील होता. याबाबतचे वृत्त सकाळमध्ये प्रकाशित झाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी हॉटेलची चौकशी केली.
तसेच कोल्हापूर पोलिसांनाही याबाबतची माहिती दिली. यावेळी हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजसुद्धा ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, स्थानिक पोलिसांनी बुकी चौधरी याची कसून चौकशी केली. या चौकशीत कोरटकर हा एसयुव्ही महेंद्र ७०० या गाडीने तेलंगणा येथे पळून गेल्याची माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारावर कोल्हापूर पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. त्यानंतर सोमवारी दुपारी कोरटकर याला अटक करण्यात आली. कोरटकर ज्या मार्गाने गेला त्या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज तसेच लक्कडकोट नाक्यावरील आणि हैद्राबाद मार्गावरील सर्व पथकर नाके व इतरत्र लावण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेजदेखील तपासण्यात आले.
तेव्हा कुठे कोरटकर याला अटक करण्यात कोल्हापूर पोलिसांना यश आले. दरम्यान, कोरटकर याला भेटून गेलेला पोलिस अधिकारी कोण, संबंधित अधिकाऱ्याने कोरटकर याला तेलंगणा राज्यात पळून जाण्यासाठी मदत केली का, याचीही चौकशी स्थानिक पोलिस करणार आहे.
कोरटकरच्या अटकेसाठी खूप उशीर झाला. त्याला अटक करायला इतके दिवस लागणे, हे महाराष्ट्र पोलिसांचे अपयश आहे. प्रशांत कोरटकर हा महाराष्ट्रद्रोही आहे. त्याचे तोंड न लपवता त्याला राज्यात आणावे. आता प्रशांत कोरटकर याचे घर सरकार तोडणार का, या प्रश्नाचे उत्तरही सरकारने द्यावे.
- विजय वडेट्टीवार, काँग्रेस विधिमंडळ नेते.