मुंबई - डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठात पहिल्यांदाच स्टार्टअपचा श्रीगणेशा झाला आहे. यासाठी विद्यापीठात एमएस्सीच्या द्वितीय वर्षांतील वनस्पतीशास्त्र विषयाचे शिक्षण घेणाऱ्या सुलक्षणा धाडगा या मुलीने रानमेव्यांपासून विविध प्रकारची उत्पादने बनवली असून त्या उत्पादनाला मोठी पसंती मिळत आहे. उच्चशिक्षित असलेल्या सुलक्षणाचे विद्यापीठात मोठे कौतुक होत आहे.
सुलक्षणा धाडगा ही पाल पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यात असलेल्या आदिवासी बहुल असलेल्या लहानशा गिरगाव या गावातील रहिवाशी आहे. आई-वडिलांनी तिला एमएस्सीपर्यंत शिक्षण देण्यासाठी जंगलातील, शेतीतील कामे करून बळ दिल्याने ती इथपर्यंत पोहोचली असून, आपल्यातील कौशल्य गुणांची आणि आई-वडिलांकडून मिळालेल्या नैसर्गिक वारशाच्या आधारावर तिने डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठात सुरू केले आहे.
यासाठी तिने नुकत्याच पार पडलेल्या जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील रानमेव्यांपासून बनविलेल्या विविध प्रकारच्या चटणी, लोणचे यांची ओळख करून देत त्याचे प्रदर्शन भरविले होते.
त्यातून तिला मोठे बळ मिळाले असल्याने त्यातून तिने या रानमेव्यांपासून तयार करण्यात येत असलेल्या विविध पदार्थांचे स्टाटअप सुरू केले असून त्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांचे मोठे पाठबळ मिळाले आहे. तर दुसरीकडे वनस्पतीशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. अर्पणा सराफ यांनीही उत्साह वाढवला असल्याचे तिने सांगितले.
अशी केली उत्पादनांची सुरूवात
सुलक्षणा धाडगा हिने तलासरी जिल्ह्यातील जंगलात मुबलक प्रमाणात मिळणाऱ्या करवंदावर प्रक्रिया करून त्यापासून लोणचे आणि चटणीचे विविध प्रकार तयार केले. त्यासोबत या पट्टयात मोठ्या प्रमाणात उत्पादन केल्या जाणाऱ्या डोंगरजिराचा(धान्य) वापर तिने चटणीसाठी केला. यासोबत अजोला, माटाची भाजी तसेच आंब्यांची चटणी तयार केली आहे.
लोणच्याचे तिने सॉल्ट वॉटरचा वापर करून चारहून अधिक प्रकार तयार केले आहेत. यात टेटूच्या शेंगा, बांबू सूट, करवंद आणि आंब्याचा वापर करून हे लोणचे तयार केले असून ती वेगळ्या चवीचे असल्याने याला येत्या काळात मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल अशी अपेक्षा विद्यापीठ प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली.
सुलक्षणा धाडगा हिच्यातील कौशल्य गुण आणि वेगळपणा तिने तयार केलेल्या स्टार्टअपमधून दिसून आला आहे. महिला दिनाच्या निमित्ताने भरविण्यात आलेल्या प्रदर्शनातून तिची ही वेगळी ओळख समोर आली. आता विद्यापीठाने तिला पाठबळ दिल्याने ती या क्षेत्रात चांगली भूमिका बजावू शकेल, असा विश्वास आहे. यासाठी विद्यापीठाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जात आहे.
- डॉ. रजनीश कामत, कुलगुरू, डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ, मुंबई
निसर्गाने आपल्याला मुबलकपणे अनेक रानमेवे, फळे, फुले दिली आहेत. त्यांचा वापर करून कसे जगायचे आमच्या लोकांना चांगले माहीत आहे. आम्ही त्याकडे व्यवसाय म्हणून करायला लागलो तर प्रतिसाद मिळत नाही. परंतु नव्या पद्धतीने आणि विद्यापीठाचे पाठबळ मिळाल्याने आमची अन्न संस्कृती आणि तिला समोर आणण्याची संधी मिळाली आहे. ती मला स्टार्टअपमधून पुढे घेऊन जायची आहे.
- सुलक्षणा धाडगा, स्टार्टअप विद्यार्थीनी