वडगाव शेरी - लष्कर पंपिंग आणि भामासखेड योजनेतून 70 दशलक्ष लिटर पाणी वडगाव शेरी साठी पाठवले जाते. मात्र टाटा गार्डरूम येथील पाण्याच्या टाकीला फ्लो मीटरच नसल्यामुळे वडगाव शेरी पर्यंत किती पाणी पोहोचते याबाबत संभ्रम आहे. येथे पाणी पोहोचेपर्यंत पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
टाटा गार्डरूम येथील पाण्याच्या तीन टाक्यांना जर फ्लोमीटर बसवला तर लोकसंख्येच्या प्रमाणात पाणीपुरवठा पुरेसा होतो का, याचा हिशोब समोर येईल.
पाण्याच्या टाक्या भरायला अपेक्षित वेळेपेक्षा जास्त वेळ लागत असल्यामुळे लष्कर पंपिंग स्टेशन वरून येणारे पाणीच कमी येते, असे पाणीपुरवठा विभागातील काही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. पाण्याच्या टाकी भरायला जास्त वेळ लागल्यामुळे पुढील पाणी वितरण नियोजनावर त्याचा परिणाम होतो.
माजी नगरसेविका श्वेता खोसे गलांडे यांनी बंडगार्डन येथे पाणीपुरवठा अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पाण्याच्या टाक्यांजवळ फ्लो मीटर तातडीने बसवण्याची मागणी केली आहे.
टाटा गार्डन येथील पाणीपुरवठा केंद्र स्थिती -
*एकूण पाण्याच्या टाक्यात - तीन.
*चंदननगर साठी एक टाकी
*उर्वरित वडगाव शेरीसाठी दोन टाक्या
* पाणीपुरवठा - 70 दशलक्ष लिटर
*अवलंबून असलेली लोकसंख्या - 50 हजार
पाणीपुरवठा यंत्रणेतील त्रुटी -
१) पाण्याच्या टाकीजवळ फ्लो मीटर नाही
२) टाक्यांची उंची कमी असल्यामुळे उंच ठिकाणी पाणी पोहोचत नाही
३) पाणीपुरवठ्याचा वेग कमी असल्यामुळे टाक्या वेळेत भरत नाहीत
४) समान पाणीपुरवठा योजनेतील अनेक जलवाहिन्या अद्याप वापरात नाहीत
५)पाणी वितरण यंत्रणा अनेक ठिकाणी जिर्ण
६) उंच ठिकाणी पाणी दाबाने पोहोचण्यासाठी यंत्रणा नाही
फ्लो मीटर बसवण्यासाठी एक ते दोन दिवसाचा पाणीपुरवठा बंद ठेवावा लागेल. आणि त्यामुळे पुढील आठ दिवस पाण्याचे नियोजन कोलमडून पडू शकते. त्यामुळे फ्लो मीटर बसवायचा राहून गेला आहे.
- एकनाथ गाडेकर (कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग)