मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी आणी विरोधक आमने सामने आले आहेत. लाडकी बहीण योजना बंद होणार असा सुर विरोधकांकडून उमटत आहेत. पण लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असं सातत्याने सत्ताधारी नेते ठणकावून सांगत आहेत.
१५०० रूपये लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होतात. पण २१०० रूपये मिळणार की नाही, असा प्रश्नही लाडक्या बहिणींच्या मनामध्ये घोंघावत आहे. अशातच 'लाडकी बहीण योजना पाच वर्ष तरी बंद होणार नाही', असं छातीठोकपणे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.
लाडकी बहीण योजनेबाबत अजित दादा काय म्हणाले?
'आमच्याकडे पाच वर्ष आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही. माझी थोडीशी तारांबळ होत आहे. पण यावर लवकरच मार्ग काढू', असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीत पक्षप्रवेश सोहळ्यावेळी ते बोलत होते.
अजित पवार गटात पक्षप्रवेश
इचलकरंजीत आज शरद पवार गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रावादी अजित पवार गटात पक्षप्रवेश केला. हा पक्षप्रवेश कार्यक्रमाचा सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित पार पडला. कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढवण्यात यावी, तसेच जास्तीत जास्त सभासद नोंदणी करण्यात यावी, अशा सुचना पवार यांनी उपस्थितीतांना दिल्या आहेत.
कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचं जाळं पसरावं
दरम्यान, 'भविष्यात कोल्हापूर जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्तीचे आमदार निवडून यावेत', अशा भावनाही अजित पवार यांनी व्यक्त केल्या आहेत. 'कार्यकर्त्यांनी संघटना मजबूत करावी, फक्त भाषणातून नसून मैदानात उतरून संघटना मजबुत करावी, तसेच कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचं जाळं जास्त पसरावं, याकडे विशेष लक्ष द्यावे', अशा सुचनाही पवारांनी दिल्या आहेत.