इस्तांबूलचे महापौर इकरेम इमामोगूल यांना झालेल्या अटकेविरोधात तुर्कीमध्ये हजारोंच्या संख्येनं लोक रस्त्यावर उतरले आहेत.
राष्ट्राध्यक्ष रिसेप तय्येप अर्दोआन यांचे प्रमुख विरोधक असलेल्या इकरेम इमामोगूल यांच्यावर झालेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी देशभरात आंदोलनाचं लोण पेटलं आहे.
बऱ्याच ठिकाणी पोलीसांनी आंदोलकांवर अश्रुधूर आणि रबरी गोळ्यांचा मारा केला. मागच्या अनेक वर्षांतील हे तुर्कीमधील सर्वात मोठं आंदोलन बनलं असून देशातील परिस्थिती असमान्य आणि अस्थिर बनत चालली आहे.
या आंदोलनाची सुरुवात इस्तांबूलमध्ये 19 मार्च रोजी झाली. त्या दिवशी देशातील प्रमुख विरोधी पक्षनेते आणि राष्ट्राध्यक्ष अर्दोआन यांचे कडवे टीकाकार इकरेम इमामोगूल यांना अटक झाल्यानंतर हे आंदोलन पेटायला सुरूवात झाली.
इकरेम इमामोगूल यांना पुढील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्दोआन यांच्या विरोधात उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरू असतानाच ही अटक झाली असल्यानं या आंदोलनानं राजकीय वळण घेतलं.
सेक्युलर रिपब्लिकन पीपल्स पार्टी (सीएचपी) या प्रमुख विरोधी पक्षाकडून 2028 साली होणाऱ्या राष्ट्रीय निवडणुकीतील राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी इकरेम इमामोगूल यांना जाहीर होणार होती. पण त्या आधीच त्यांना सरकारनं अटक केल्यानं या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उभा ठाकले होते.
पण सरकारच्या या कारवाईचा निषेध म्हणून सेक्युलर रिपब्लिकन पीपल्स पार्टी (सीएचपी) या पक्षानं इकरेम इमामोगूल तुरूंगात असतानाच 23 मार्च रोजी म्हणजे रविवारी तेच आमचे राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार असणार आहेत, याची घोषणा केली. यासाठी पक्षांतर्गत मतदान देखील घेतलं गेलं. ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तर आंदोलनाला आणखी धार आलेली आहे.
इकरेम इमामोगूल यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असून त्यासाठीच आम्ही त्यांना अटक करत आहोत, असा दावा अर्दोआन सरकारनं केला आहे. तर दुसऱ्या बाजूला इकरेम इमामोगूल यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. इकरेम इमामोगूल सोबतच या आरोपांच्या तपासा करिता आणखी 100 लोकांना पोलिसांनी तुरुंगात डांबलं आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अटकेचं समर्थन करण्यासाठी इकरेम इमामोगूल यांच्यावर रविवारी विविध गुन्हे नोंदवले गेले.
यात गुन्हेगारांचं जाळं चालवणे, लाच घेणे, खंडणी वसूल करणे, गोपनीय व वैयक्तिक माहिती अवैधरित्या गोळा करणे आणि कंत्राट मिळवण्यासाठी अनैतिक मार्गांचा अवलंब करणे इत्यादी आरोप इकरेम इमामोगूल यांच्यावर ठेवले गेले आहेत. अटक झाल्यानंतर तत्काळ इकरेम इमामोगूल यांची इस्तांबूलच्या महापौर पदापासून गच्छंती करण्यात आलेली आहे.
इकरेम यांच्या सीएचपी पक्षानं ही कारवाई म्हणजे देशाच्या पुढील राष्ट्राध्यक्षाला सत्तेवर येण्यापासून रोखण्यासाठी रचलेलं षड्यंत्र असल्याचा आरोप केलाय.
या अनैतिक कारवाईचा निषेध करण्यासाठी लोकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करावं, असं जाहीर आवाहनही या पक्षानं केलं आहे.
देशभरात पसरलेली आंदोलनाची लाट बघता सीएचपी पक्षाच्या या आवाहनाला तुर्कीच्या नागरिकांनी चांगलाच प्रतिसाद दिल्याचं दिसून येत आहे.
इस्तांबूलमधील वेगवेगळ्या विद्यापीठातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात या आंदोलनात रस्त्यावर उतरले आहेत. इस्तांबूलमधील रस्ते "आम्ही कोणाला भीत नाही, आमचा आवाज कोणी दाबू शकत नाही, आम्ही सत्तेपुढे झुकणार नाही," अशा घोषणांनी दुमदुमून गेले आहेत.
सुरुवातीला हे आंदोलन इस्तांबूलमध्ये अगदी छोट्या प्रमाणात सुरू झालं होतं. पण हळूहळू आंदोलनाची लाट इतकी पसरली की 1 कोटी 60 लाख लोकसंख्या असलेलं हे तुर्कीतील सगळ्यात मोठं शहर आता या आंदोलनाचं प्रमुख केंद्र बनलं होतं. इस्तांबूलमधील रस्ते या आंदोलकांनी आणि त्यांच्या घोषणाबाजींनी दुमदुमून गेले आहेत.
इस्तांबूलनंतर या आंदोलनाचं लोण तुर्कीतील इतर शहरांमध्ये देखील पसरलं असून त्यामुळे हे आंदोलन आता देशव्यापी बनलं आहे. इतक्या मोठ्या संख्येनं देशाच्या कानाकोपऱ्यात पसरलेलं हे मागच्या काही वर्षातील सर्वात मोठं आंदोलन ठरलं आहे.
बहुतांशी ठिकाणी हे आंदोलन शांततापूर्ण मार्गानं पार पाडलं जात असलं तरी काही मोजक्या ठिकाणी पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष पेटलेला देखील पाहायला मिळाला. या ठिकाणी जमावाला पांगवण्यासाठी पोलीसांनी आंदोलकांवर अश्रू धुराच्या नळकांड्या आणि पाण्याच्या फवाऱ्यांचाही मारा केला.
मागच्या काही दिवसांपासून सरकारकडून पोलीस व तपास यंत्रणांमार्फत राष्ट्राध्यक्ष अर्दोआन यांच्या विरोधात मत मांडणाऱ्या लोकांवर कारवाईचा बडगा सुरू झाला होता. यात फक्त विरोधी पक्षातील राजकारणीच नव्हे तर पत्रकार आणि मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांनाही सरकारकडून लक्ष्य केलं गेलं.
इकरेम इमामोगूल यांची अटक हे फक्त एक निमित्त अथवा हिमनगाचं टोक असून सत्ताधारी सत्तेचा गैरवापर करत देशात अराजकता माजवत असल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे.
राष्ट्राध्यक्ष अर्दोआन तुर्कीला लोकशाही कडून हुकूमशाही कडे घेऊन चालले आहेत, असा या आंदोलकांचा आरोप आहे. यासोबतच आरोग्य सेवा आणि एकूणात अर्थव्यवस्था हाताळण्यात राष्ट्राध्यक्ष अर्दोआन यांना आलेलं अपयश हे सुद्धा या आंदोलकांमधील वाढत्या रोषाचं प्रमुख कारण आहे.
राष्ट्राध्यक्ष अर्दोआन यांच्या या मनमानी एकाधिकारशाहीचा निषेध करण्यासाठीच आम्ही रस्त्यावर उतरलो असल्याचं आंदोलकांनी म्हटलं.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.