सुटीच्या दिवशीही
वीजबिल भरणा केंद्रे
कणकवली ः महावितरणच्या कोकण परिमंडळातील रत्नागिरी अंतर्गत महावितरणला ३१ मार्च अखेर विजबिलाची २३ कोटी ७० लाखांची थकीत रक्कम वसूल करायची आहे. त्यासाठी महावितरणने मोहीम तीव्र केली असून वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना दिले आहेत. वीज बिल भरणा करण्यासाठी जिल्हात सुटीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्रे सुरू राहतील, असे महावितरणने कळवले आहे. त्यामुळे वीज ग्राहकांनी चालू तसेच थकीत वीजबिल भरावे आणि आपली गैरसोय टाळावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. चालू आर्थिक वर्षाचे केवळ ८ दिवस शिल्लक आहेत. कोकण परिमंडल रत्नागिरी अंतर्गत रोज २ कोटी ६३ लाख वसूल करायचे आहेत. वसुलीसाठी कर्मचारीच नाही तर मुख्य अभियंता अनिल डोये यांच्यासह रत्नागिरी मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता वैभवकुमार पाथोडे, सिंधुदुर्ग मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता अशोक साळुंखे आदींची टीम वसुली मोहिमेत सहभागी आहे.