संस्काराचा उपयोग समाजासाठी
करावा ः चंद्रशेखर लिंग्रस
फोंडाघाटमध्ये एनएसएस शिबिराची सांगता
फोंडाघाट,ता. २३ ः सह जीवन जगण्यात एक वेगळाच आनंद देऊन जातो. या काळात आपण अनेकांना भेटतो. दत्तक खेड्यातील अपरिचित माणसं परिचित होऊन जातात. एक जिव्हाळा निर्माण होतो. शिबिरार्थिंसाठी तर ती एक पर्वणीच असते. सहकाराची वृत्ती वाढते आणि एकोप्याची भावना निर्माण होते. त्यामुळे एक संस्कारक्षम पिढीची संकल्पना येथे साकारते, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. या संस्काराचा उपयोग समाजासाठी करा, असे प्रतिपादन फोंडाघाट शिक्षण संस्थेचे सचिन चंद्रशेखर लिंग्रस यांनी केले.
येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाटच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे निवासी शिबिर सांगता समारंभ झाला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव लिंग्रस उपस्थित होते. ते म्हणाले, ‘‘अशा प्रकारची शिबिरे म्हणजे गांधीजींच्या विचारांची जडणघडण एनएसएसच्या उपक्रमातून होते असे लक्षात येते. जीवनानुभव देणारी ही सेवा असते व त्यातून आपल्या उज्वल परंपरेचे दर्शन घडवत असतो.’’ कार्यक्रमाधिकारी डॉ. बालाजी सुरवसे म्हणाले, ‘‘या दत्त खेड्यातील प्रत्येक व्यक्तीचे या शिबिराला सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांनी सात दिवसांत शिस्तबद्ध अनेक उपक्रम पार पडले. बौद्धिक चर्चासत्रे झाली. त्यांनी सातही दिवसाचा धावता आढावा घेतला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शिबिरातील काही अनुभव व्यक्त करताना विद्यार्थ्यांची मनोगते झाली. त्यात काशी सावंत, रोहित वाघाटे, देवदीप परब, रितेश बावकर, ओमकार गुरव, प्रियांका मोंडकर यांचा सहभाग होता. प्रा. कीर्ती पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. संतोष आखाडे यांनी आभार मानले.