कल्याण-डोंबिवलीत नव्या ६५ बालवाड्या
महापालिका शाळांचा होणार कायापालट
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २३ : खासगी शाळांकडे पालकांचा ओढा असल्याने महापालिका शाळांची पटसंख्या झपाट्याने कमी होत आहे. घटती पटसंख्या पाहता कल्याण-डोंबिवली महापालिका शिक्षण विभागाने पालिका शाळा अद्यावत करण्यास सुरुवात केली आहे. शाळांसोबतच बालवाडी अद्ययावत करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. येत्या शैक्षणिक वर्षात ६५ सुसज्ज अशा बालवाड्या सुरू करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. तसेच पालिका शाळांचा कायापालट सुरू असून, शाळांमध्ये अद्ययावत अशा बालवाडीत पटसंख्या वाढविण्यावर भर देणार असल्याचे म्हटले जात आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका शिक्षण विभागाच्या सध्याच्या घडीला ५९ शाळा असून, यात साडेसात हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पूर्वी पालिकेच्या ७१ शाळांमधून सुमारे १० हजारांहून अधिक विद्यार्थी हे शिक्षण घेत होते. गेल्या १०-१२ वर्षात पालिका शाळांना उतरती कळा लागली असून, विद्यार्थ्यांची संख्यादेखील कमी होत आहे. पालिका शाळांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण शाळेत देण्यासाठी पालिका प्रशासन शिक्षण विभागाने शाळा अद्ययावत करण्यास सुरुवात केली आहे. शाळांच्या दुरुस्तीसह रंगरंगोटी करण्यात येत आहे. आतापर्यंत आठ शाळांचे काम पूर्णत्वास आले आहे. उर्वरित शाळांचे काम परीक्षा पूर्ण झाल्यानंतर दोन महिन्यांच्या कालावधीत करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.
शाळांच्या सक्षमीकरणासाठी तसेच नावीण्यपूर्ण तंत्रज्ञान अभ्यासक्रम सुविधा पुरविण्यासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पात ३० कोटींची तरतूद केली आहे. शाळांमध्ये व्यवस्थापन व शिक्षणात नावीन्यता आणण्यासाठी आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रम राबविला जाणार आहे. ऑपरेटेड ‘सोलर रोबोटिक्स कोडिंग आर्टीफिशिअल इंटेलिजन्स प्रयोगशाळा’ ही सुविधा पुरविण्यासाठी तीन कोटी मंजूर केले आहेत. शाळा दुरुस्ती, नवीन शाळा बांधकाम, शाळांना फर्निचर पुरविणे, आकर्षक रंगरंगोटी करणे या माध्यमातून शाळांचे सक्षमीकरण केले जाणार आहे. यासाठी १२ कोटी ४१ लाखांचा निधी मंजूर केला आहे. तसेच यंदा आदर्श शाळांची उभारणी केली जाणार आहे.
५०२ सीसीटीव्ही कॅमेरे
राज्य सरकार व महापालिकेच्या माध्यमातून यासाठी आठ कोटी २० लाख रुपयांची तरतूद केली आहे. येत्या शैक्षणिक वर्षात सर्व सोयीसुविधांसह शाळा अद्ययावत केल्या जाणार आहेत. सरकारी निर्णयानुसार पालिकेच्या एकूण ५९ शाळांमध्ये एकूण ५०२ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. यात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे.
येत्या शैक्षणिक वर्षात ६५ बालवाड्या केडीएमसी क्षेत्रात सुरू करण्याचा शिक्षण विभागाचा मानस आहे. सीएसआर फंडसाठीदेखील आम्ही आवाहन केले आहे. यासोबतच पालिका शाळांची दुरुस्ती करण्याचे काम सुरू आहे. आठ शाळांची कामे पूर्ण झाली असून, उर्वरित शाळांची कामे लवकरच पूर्ण होतील. शाळांची पटसंख्या वाढावी म्हणून मोहीम राबविली जात असून, प्रत्येकी शाळेत २५ नवीन विद्यार्थ्यांचे ॲडमिशन व्हावे, असा आमचा मानस आहे.
संजय जाधव, उपआयुक्त शिक्षण विभाग, केडीएमसी.