रविवारी इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्स विरुद्ध ४ विकेट्सने विजय मिळवला. चेन्नईने घरच्या मैदानात एमए चिदंबरम स्टेडियम (चेपॉक) येथे पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळताना या हंगामाची विजयी सुरुवात केली आहे. मात्र, सलग १३ व्या वर्षी मुंबई इंडियन्सने त्यांच्या हंगामातील पहिला सामना पराभूत झाला आहे. २०१३ पासून एकदाही मुंबई इंडियन्सला पहिला सामना जिंकता आलेला नाही. दरम्यान, रविवारी नियमित कर्णधार हार्दिक पांड्यावर गेल्यावर्षीच्या स्लो ओव्हर रेटच्या नियमाअंतर्गत एका सामन्याची बंदी असल्याने तो मुंबई इंडियन्ससाठी उपलब्ध नव्हता. त्यामुळे सूर्यकुमार यादवने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध मुंबई इंडियन्सचे नेतृत्व केले. दरम्यान, सामन्यानंतर सूर्यकुमारने मुंबई इंडियन्सच्या पराभवामागील कारणही सांगितले.
या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ९ बाद १५५ धावा केल्या होत्या. मुंबई इंडियन्सकडून तिलक वर्मा (३१), सूर्यकुमार यादव (२९) आणि दीपक चाहर (२८*) यांनाच २० धावांचा टप्पा पार करता आला. तसेच चेन्नईकडून गोलंदाजी करताना नूर अहमदने ४ विकेट्स घेतल्या, तर खलील अहमदने ३ विकेट्स घेतल्या.
नंतर १५६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईने राहुल त्रिपाठीची विकेट लवकर गमावली होती. मात्र कर्णधार ऋतुराज गायकवाडने आक्रमक खेळ करत अर्धशतक झळकावले. त्याच्या या खेळीमुळे चेन्नईसाठी विजय सोपा झाला होता. त्याने २६ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांसह ५३ धावांची खेळी केली.
पण नंतर विग्नेश पुथुरने मुंबईसाठी चांगली फिरकी गोलंदाजी करताना ऋतुराजसह शिवम दुबे आणि दीपक हुडा यांनाही माघारी धाडले. त्याने ३ विकेट्स घेतल्या. पण रचिन रवींद्रने शेवटपर्यंत टिकून राहत चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. रचिनने ४५ चेंडूत ६५ धावांची नाबाद खेळी केली. रवींद्र जडेजाने १७ धावा केल्या. त्यामुळे चेन्नईने १५६ धावांचे लक्ष्य १९.१ षटकात ६ विकेट्स गमावत पूर्ण केले.
या सामन्यानंतर सूर्यकुमार यादव म्हणाला, 'नक्कीच, आम्हाला १५-२० धावा कमी पडल्या. पण आमच्या खेळाडूंनी चांगला लढा दिला.' विग्नेशबद्दल बोलताना सूर्यकुमार म्हणाला, 'मुंबई इंडियन्स याचसाठी ओळखले जातात, ते युवा खेळाडूंना संधी देतात. मुंबई इंडियन्सकडून १० महिने अशा खेळाडूंचा शोध सुरू असतो आणि विग्नेश त्याचेच फळ आहे. जर सामना आणखी पुढे गेला असता, तर म्हणून मी त्याचे एक षटक नंतर राखून ठेवले होते. पण त्याला १८ व्या षटकात गोलंदाजी देणे सोयीचे होते. मैदानात फार दव नव्हते, पण मैदानात थोडं चिकट होतं. मात्र ऋतुराजने ज्याप्रकारे दुसऱ्या डावात फलंदाजी केली, त्याच्या डावाने सामना आमच्यापासून दूर नेला. पण अजून स्पर्धेत बरेच सामने बाकी आहेत.'
विग्रेशने मुंबईच्या डावात ७ ते १२ षटकांदरम्यान तीन षटके गोलंदाजी करताना ३ विकेट्स घेतल्या होत्या. पण त्याला त्याचे चौथे षटक टाकण्यासाठी १८ व्या षटकाची वाट पाहावी लागली होती. या षटकात मात्र त्याने १५ धावा खर्च केल्या. त्यामुळे त्याला सलग चौथे षटक का दिले नाही असा प्रश्न उपस्थित झाला होता, ज्याबद्दल सुर्याने सामन्यानंतर उत्तर दिले आहे.
दरम्यान आता मुंबई इंडियन्सला पुढचा सामना २९ मार्च रोजी अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध खेळायचा आहे.