भूषण ओक - शेअर बाजार विश्लेषक
गेल्या काही वर्षांमध्ये वाहनांमध्ये सॉफ्टवेअर तंत्रज्ञानाचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. पूर्णपणे स्वयंचलित वाहने अजूनही विकासावस्थेत असली, तरी आधुनिक गाड्यांमध्ये ३६० अंशांचा दृष्टीटप्पा, ट्रॅफिकबद्दल इशारे, सुरक्षित लेन, इंटरनेट कनेक्टिव्हिटी, पार्किंगसाठी मदत अशा अनेक सोयी उपलब्ध असतात. या सर्वांसाठी अनेक प्रकारचे सेन्सर वापरले जातात, जे सॉफ्टवेअरच्या माध्यमातून वाहनचालकाला माहिती पुरवतात. केपीआयटी टेक्नॉलॉजीज ही ऑटोमोटिव्ह क्षेत्रात जागतिक स्तरावर काम करणारी एक कंपनी आहे, जी वाहनांसाठी सॉफ्टवेअर विकास आणि जोडणीमध्ये विशेषज्ञ आहे. रवी पंडित आणि किशोर पाटील यांनी १९९० मध्ये स्थापन केलेली ही कंपनी आघाडीच्या मोटार उत्पादकांसाठी एक प्रमुख सॉफ्टवेअर भागीदार म्हणून विकसित झाली आहे. युरोप, अमेरिका, जपान, चीन, थायलंड आणि भारतस्थित तीस अभियांत्रिकी केंद्रांसह ही कंपनी जागतिक स्तरावर कार्यरत आहे. रेनॉ आणि होंडा या प्रमुख ग्राहकांसमवेत जगातील अनेक वाहन उत्पादकांना ही कंपनी अप्रत्यक्षरीत्या सेवा पुरवते.
आर्थिक आकडेवारी : कंपनीची विक्री आणि निव्वळ नफा गेल्या तीन वर्षांमध्ये ३४ टक्के आणि ६१ टक्के चक्रवाढ दराने वाढले आहेत. हे आकडे प्रचंड वेगाने होणारी वाढ दर्शवतात. कंपनीचे कर्ज आणि भागभांडवलाचे गुणोत्तर ०.१४ म्हणजे नगण्य आहे. आणि या वर्षीचा ‘आरओसीई’ ३८.४ टक्के म्हणजे उत्तम आहे. व्यवसायवाढीच्या संधी उपलब्ध असलेल्या कंपन्या त्यांचा निव्वळ नफा बहुतांशी भांडवली गुंतवणुकीसाठी वापरतात. या गुंतवणुकीवर मिळणारा परतावा ‘आरओआयआयसी’ या गुणोत्तराने मोजला जातो. या कंपनीचे हे गुणोत्तर ३५ टक्के म्हणजे खूप उत्तम आहे. कंपनीचे खेळत्या भांडवलाचे नियोजन उत्तम आहे. कंपनीच्या ताळेबंदावर एकूण मालमत्तेच्या सुमारे २५ टक्के हिस्सा रोकड आणि गुंतवणुकींमध्ये आहे म्हणजे ताळेबंद मजबूत आहे. मात्र, ३१ टक्के हिस्सा अमूर्त संपत्तीत आहे. सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये अमूर्त संपत्ती नेहमीच लक्षणीय असते. कंपनीची रोकड आवक कार्यचालन नफ्याच्या तुलनेत उत्तम आहे.
मूल्यांकन : कंपनीचा शेअर सध्या ४७.९ या पीई गुणोत्तराला उपलब्ध आहे, जे ५८.१ या पाच वर्षांच्या सरासरीपेक्षा बरेच कमी आहे. पीईजी ०.९७, ईव्ही ईबीटा गुणोत्तर २७.४ असे इतर आकडे वाजवी आहेत. प्राइस कॅश आणि प्राइस सेल्स ही गुणोत्तरे अनुक्रमे ३६.२ आणि ६.४ म्हणजे जास्त आहेत. या कंपनीच्या मुक्त रोकड आवक रकमेत (फ्री कॅश फ्लो) गेल्या तीन वर्षांमध्ये १४ टक्के चक्रवाढ दिसते. ‘डीसीएफ’ पद्धतीनुसार पुढील पाच वर्षांसाठी मुक्त रोकड आवक रकमेत १५ टक्के वाढ धरली, तरी कंपनीचे आंतरिक मूल्य ७०० रुपये येते, जे सध्याच्या भावापेक्षा बरेच अधिक आहे.
निष्कर्ष : वॉरन बफेट यांच्या मूल्यांकनाच्या निकषांनुसार, या कंपनीचा शेअर सध्याच्या भावात घेण्यायोग्य नसला, तरी कंपनीचे व्यवसाय आणि नफावाढीचे उत्तम आकडे बघता आणि बाजाराने आतापर्यंत या कंपनीला दिलेले उच्च मूल्यांकन लक्षात घेता, ज्या गुंतवणूकदारांची जोखीम घेण्याची क्षमता आहे, त्यांनी सद्यस्थितीत या शेअरमध्ये गुंतवणुकीचा अवश्य विचार करावा.
(डिस्क्लेमर : हा लेख केवळ शैक्षणिक उद्दिष्टांसाठी असून, गुंतवणूकदारांनी प्रत्यक्ष गुंतवणुकीसाठी त्यांच्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अपेक्षित आहे.)