सुधाकर कुलकर्णी - सर्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनर-सीएफपी
आजकाल सर्व व्यापारी, सहकारी बँका, पतपेढ्या आणि बिगर बँकिंग वित्तीय संस्था (एनबीएफसी) अगदी एखाद्या तासाभरात सोनेतारण कर्ज देतात. आपल्याकडील सोन्यावर किती कर्ज मिळेल, हे विविध बाबींवर अवलंबून असते.
१८ कॅरटपेक्षा कमी शुद्धतेच्या सोन्यावर कर्ज दिले जात नाही व जितके कॅरट जास्त, तितके प्रतिग्रॅम जास्त कर्ज दिले जाते.
कर्ज रक्कम सोन्याच्या प्रचलित भावावर अवलंबून असते, यासाठी ‘एलटीव्ही’चा (लोन टू व्हॅल्यू) निकष लावला जातो. उदा. आपल्याकडे असलेल्या सोन्याची किंमत पाच लाख रुपये आहे, तर त्याच्या ७५ टक्के किंवा पाऊणपट कर्ज दिले जाते म्हणजे पाच लाख रुपये मूल्याच्या सोन्याच्या बदल्यात ३.७५ लाख रुपये कर्ज मिळते.
किमान व कमाल कर्ज रक्कम बँक किंवा ‘एनबीएफसी’नुसार कमी अधिक असू शकते. बँकांचे किमान व कमाल कर्ज ५००० ते ३५ लाख रुपयांपर्यंत असते, तर ‘एनबीएफसी’ किमान २० हजार रुपये आणि कमाल दोन कोटी रुपयांपर्यंत कर्ज देऊ करतात.
बँकांचा व्याजदर आठ ते दहा टक्क्यांच्या दरम्यान असतो, तर ‘एनबीएफसी’चा
व्याजदर १२ ते १८ टक्के किंवा त्याहूनही अधिक असू शकतो.
कर्जाची मुदत तीन महिने ते तीन वर्षे असू शकते व कर्ज ओव्हरड्राफ्ट स्वरूपात मिळू शकते. परतफेड मासिक हप्त्याने किंवा मुदतीनंतर एकरकमी पद्धतीने करता येते.
आपल्याकडे असणाऱ्या सोन्याच्या प्रमाणात त्वरित व कमीतकमी कागदपत्रे देऊन कर्ज घेऊन तातडीची गरज भागविता येते. यासाठी जामीनदार द्यावे लागत नाहीत. शक्यतो बँकेकडून असे कर्ज घेणे हितावह असते. अर्थात, आपली गरज मोठ्या प्रमाणावर असल्यास व तेवढे सोने असल्यास ‘एनबीएफसी’चा पर्याय निवडावा. कर्ज घेताना दिलेल्या दागिन्यांचा तपशील; तसेच फोटो आपल्याकडे ठेवावा. त्याची पोचपावती घ्यावी व कर्जफेड केल्यावर पावती व फोटोनुसार दागिने असल्याची खात्री केल्यानंतरच दागिने मिळाल्याची पोहोच द्यावी.