पुणे : ‘‘महिलांबाबत ज्या प्रमाणे समाज, धर्म, शिक्षण, नोकरी, व्यवसाय अशा सर्वच क्षेत्रांमध्ये भेदभाव, दुजाभाव केला जातो. तसाच तो शेती क्षेत्रातही केला जातो. त्यामुळे आज शेतीक्षेत्रात राबणाऱ्या महिलांची संख्या ही पुरुषांइतकीच किंबहुना त्यांच्यापेक्षा अधिक असूनही अद्याप त्यांना शेतकरी म्हणून मान्यता मिळू शकलेली नाही, हे वास्तव आहे. त्यांची ओळख शेतकरी महिला अशी न होता शेतकऱ्याची मुलगी, पत्नी अशी होते आणि तेच आज शेतीपुढे असलेल्या अनेक संकटांचे प्रमुख कारण आहे,’’ असे मत ज्येष्ठ पत्रकार आणि पीपल्स अर्काइव्ह ऑफ रूरल इंडियाचे संस्थापक पी. साईनाथ यांनी व्यक्त केले.
महिला किसान अधिकार मंचातर्फे (मकाम) आयोजित ‘भविष्य पेरणाऱ्या’ या संकल्पनेवरील महिला शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित बहुविध माध्यम प्रदर्शनात रविवारी (ता. २३) ‘महिला, शेती आणि काम’ या विषयावर पी. साईनाथ बोलत होते.
या वेळी पी. साईनाथ यांनी जगभरातील शेतीक्षेत्रातील महिलांच्या स्थितीवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘‘जगभरात कृषी क्षेत्रापुढे अनेक संकटे आहेत. त्याची अनेक कारणे आहेत मात्र त्यातही प्रमुख कारण म्हणजे शेतकरी म्हणून महिलांना अद्याप मान्यता नसणे हे आहे. आज शेतीबरोबरच पूरक व्यवसायांमध्येही जसे की दुग्धोत्पादन, पशुपालन, मधुमक्षिकापालन अशा अनेक व्यवसायांत महिला पुरुषांच्या बरोबरीने किंबहुना त्यांच्यापेक्षा जास्त काम करत असूनही त्यांच्याबाबतीत दुजाभाव, भेदभाव केला जातो.’’
‘लाडकी बहीण’साठी तरतूद कुठून?या वेळी पी. साईनाथ यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेचा उल्लेख केला. ते म्हणाले, ‘लाडकी बहीण’ योजनेला विरोध नाही. महिलांना जर दरमहा पैसे मिळत असतील तर काहीच हरकत नाही. त्यांना उलट अधिक पैसे मिळावेत असे वाटते. पण या योजनेसाठी जी तरतूद केली जात आहे ती कुठून केली जात आहे, तर ती तरतूद मनरेगा, बालविकास, पोषण आहार, अंगणवाडी या योजनांच्या तरतुदींना कात्री लावून ‘लाडकी बहीण’साठी निधी वळविला जात आहे, अशी टीका त्यांनी केली.