पोटच्या मुलाला दगडाला बांधून मजुरी करणाऱ्या आईचा एक भयान वास्तव्य दाखवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लहान मुलाला दगडाला बांधून आई मजुरीचे काम करते. सातारा जिल्ह्यातल्या महाबळेश्वरमधील हा व्हिडीओ असून सध्या तो चर्चेत आला आहे. या माऊलीवर ही परिस्थिती का आली की तिला आपल्या मुलाला दगडाला बांधून ठेवत काम करावे लागते यामागचे कारण देखील समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, होणारा व्हिडिओ साताऱ्यातील महाबळेश्वरमधील दानवली या दुर्गम खेडेगावातील आहे. या व्हिडिओमध्ये अवघ्या तीन वर्षाचं लेकरू कडक उन्हात दगडामध्ये खेळताना पाहायला मिळत आहे. तीन वर्षांच्या या मुलाला उन्हामध्ये दगडाला बांधून त्याची आई पोटाची खळगी भरण्यासाठी कष्ट करते. या मुलाची आई मोलमजुरी करून आपला संसार सावरत आहे.
मुलगा ३ वर्षांचा झाला तरी त्याला बोलता येत नाही. या मुलाला दवाखान्यात दाखवलं नाही का? असा प्रश्न त्याच्या आईला विचारण्यात आला तेव्हा त्यांनी दिलेले उत्तर हृदय हलवून टाकणारे होते. या मुलाच्या आईने सरळ पैसे नाहीत त्यामुळे दवाखान्यात त्याला नेले नाही असे सांगितले. मजुरीचे काम करत असताना आपल्या नजरेपासून आपलं लेकरू लांब जाऊ नये यासाठी त्याच्या पायाला दगड बांधून काम करण्याची वेळ या आईवर आली.
परिस्थितीनुसार आलेली गरिबी आणि याच गरिबीमुळे पोटाची खळगी भरण्यासाठी मजुरी करणाऱ्या महिलेचं आणि तिच्या लेकराचं भयान वास्तव्य युट्युबर शितल दानवले यांनी ब्रँड शेतकरी या यूट्यूब चॅनलवर दाखवले आहे. सध्या हा मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. युट्युबर शितल दानवले यांनी सांगितले की, 'मी एक शेतकरी महिला आहे माझ्या परीने जेवढं करता आलं तेवढं मी केलं. या लेकराला बोलता यावं या लेकराला मदत मिळावी आणि शासनाने या लेकराकडे लक्ष द्यावं ही माझी विनंती आहे. शासनाने कामं केली किंवा नाही केली यापेक्षा जी कामे केली ती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचली पाहिजेत अशी कामं करा हीच माझी विनंती आहे.'