भोसरी, ता. २५ ः भोसरीतील विविध रस्त्यांवरील गटारांच्या (चेंबर) झाकणे रस्त्याच्या पातळीप्रमाणे समतल ठेवण्याऐवजी उंच-खोल असल्याने वाहने आदळून चालकांना अपघात होत आहेत. वाहनांबरोबरच चालकही पाठदुखीने खिळखिळे होत आहेत. हे लक्षात घेऊन रस्त्यावरील गटारांचे झाकणे रस्त्याशी समतल करण्याची मागणी वाहन चालकांमधून होत आहे.
भोसरीतील पीसीएमसी चौक, संत तुकारामनगरातील संत तुकाराम मंदिरासमोरील रस्ता, कृष्ण मंदिरासमोरील रस्ता, आळंदी रस्ता, कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाजवळील गिर्यारोहक कै. रमेश नारद गुळवे मार्ग, पुणे-नाशिक महामार्गावर आदिनाथनगर ते चांदणी चौक त्याचप्रमाणे इंद्रायणीनगरकडून ओमनगरीकडे जाणारा रस्ता, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलसमोरील रस्ता, पेठ क्रमांक दोनमधील माऊली रेसिडेन्सीसमोरून यशवंतराव चव्हाण चौकाकडे जाणारा रस्ता, राधाकृष्ण मंदिर ते नाना-नानी उद्यानाकडे जाणारा रस्ता, संतनगर चौक ते स्पाइन सिटी चौकाकडे जाणारा रस्ता आदीं रस्त्यावरील गटाराच्या झाकणांची पातळी काही ठिकाणी रस्त्यावर तर काही ठिकाणी रस्त्याखाली आहे. काही ठिकाणी गटाराच्या झाकणाजवळील सिमेंट निखळून पडल्याने खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना रस्त्यावरील हे खड्डे चुकवताना कसरत करावी लागत आहे. त्याचप्रमाणे वर्दळीच्या रस्त्यावर वाहन चालकांना अपघातही होत आहेत. रस्त्याशी असमतोल असणाऱ्या गटारांवरुन वाहने आदळत असल्याने वाहन चालकांच्या पाठदुखीच्या त्रासात वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे सतत आदळल्याने वाहनेही खिळखिळी होत आहेत.
दिघी रस्त्यावरील चेंबरची दुरुस्ती
‘सकाळ’ने यापूर्वी धोकादायक गटारांबद्दल बातमीच्या माध्यमातून आवाज उठवल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेने भोसरीतील दिघी रस्त्यावरील गटाराची (चेंबर)ची दुरुस्ती केली आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. त्याचप्रमाणे उर्वरित धोकादायक गटारांची दुरुस्ती केव्हा होणार ? असा सवालही त्यांनी केला आहे.
भोसरीतील पावसाळी वाहिन्यांच्या गटारांची पाहणी करून ती दुरुस्त करण्यात येणार आहेत. जलनिस्सारण वाहिनीला जोडलेल्या गटारांची कामे जलनिस्सारण विभागाद्वारे करण्यात येतील.
- शिवराज वाडकर, कार्यकारी अभियंता (स्थापत्य) ‘ई’ क्षेत्रीय अधिकारी
भोसरी परिसरातील रस्त्याचे डांबरीकरण होते. मात्र त्यानंतर डांबरीकरणामुळे रस्त्याच्या खाली गेलेल्या गटाराच्या अथवा पावसाळी वाहिन्यांच्या गटारांचे काम महापालिकेद्वारे तातडीने करण्यात येत नाही. त्यामुळे वाहन चालकांचे अपघात होत आहे.
- सुमीत वनगाडे, वाहन चालक