पुणे, ता. २५ : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) रिंगरोडसाठी सर्व प्रकाराच्या मान्यता झाल्या, निविदाही काढून कामही देण्यात आले, प्रत्यक्ष जागेवर कामाला सुरूवात झाली. आता मात्र निधीची अडचण जाणवू लागली आहे. भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी सुमारे चार हजार ४०० कोटी रुपयांचा थकीत निधी त्वरित वितरित करावा, अशी मागणी जिल्हा प्रशासनाने महामंडळाकडे केली आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी ‘एमएसआरडीसी’कडून रिंगरोडचे काम हाती घेण्यात आले आहे. पूर्व आणि पश्चिम अशा दोन टप्प्यांमध्ये या मार्गाचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी पुणे जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील एक हजार ८८७ हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे ११ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये राज्य सरकारकडून या मार्गाच्या भूसंपादनाचा मोबदला वाटप करण्यासाठीचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत १५ मार्चपर्यंत भूसंपादन पूर्ण करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार पश्चिम विभागाच्या मार्गाचे काम आतापर्यंत ९२ टक्के पूर्ण झाले आहे. तर पूर्व विभागाच्या मार्गाचे भूसंपादन ८० टक्क्यांहून अधिक झाले आहे. महामंडळाने भूसंपादनासाठी आतापर्यंत सात हजार १९४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र, उर्वरित निधी उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे जमिनीचे संपादन झाले असले तरी शेतकऱ्यांना मोबदल्याचे वाटप करणे राहिले असल्याचे ओरड सुरू झाली आहे.
याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी महामंडळाला पत्र देऊन तातडीने हा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली आहे. त्या पत्राची प्रत ‘सकाळ’च्या हाती आली आहे.
अशी आहे रिंगरोडची सद्य:स्थिती (आकडे कोटी रूपयांत)
पश्चिम भागातील रिगरोडच्या भूसंपादनाची स्थिती
तालुका --अंदाजे संपादन क्षेत्र----आवश्यक निधी--उपलब्ध निधी---मोबदला वाटप ---शिल्लक निधी--आवश्यक निधी
मावळ--१४१.४३--१८०५.५३---५५१.९७----४७०.७०----८१.२७------१२५३.५६
मुळशी--२७७.६०--१९००.४१--१३०९.०१---१२३६.४६----७२.५५----५९९.४०
हवेली--२२९.८१--५८२.४०--४२८.९५------३८४.५८-----४४.३७----१५३.४५
भोर--१४१.९२----२६४.९४--१२१.६७-------९४.१३------२७.५३----१४३.२७
एकूण--७९०.७६----४५५३.२८---२४११.६---२१८५.८७---२२५.७२---२१४९.६८
पूर्व भागातील रिगरोडच्या भूसंपादनाची स्थिती
मावळ---२२८.३८----१२८८.५५----९७७.१५-----९२५.५४------५१.६१------३११.४०
खेड-----२९४.६८----१८१५-------१५०७.५४------१४२३.९२---८३.६१------३०७.४६
हवेली---२९८.१९----१८२१.४२----१४५४.५२----१४०७.४९-----४७.०३------३६६.९०
पुरंदर----२७५.०६---९८८.१६---५०१.३२--------४५१.२९-------५०.०३------४८६.८४
एकूण--१०९६.३१--५९१३.१३----४४४०.५३------४२०८.२४------२३२.२८----१४७२.६
पुरंदरमधील माझी जमीन रिंगरोडसाठी संपादित करण्यात आली आहे. त्याच्या मोबदल्याची रक्कम अद्यापही मला मिळालेली नाही. वारंवार मागणी करूनही राज्य सरकारकडून निधी उपलब्ध झाला नाही, म्हणून मोबदला वाटप होत नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
- एक शेतकरी