मुरबाड, ता.२५ (वार्ताहर)ः ठाणे जिल्ह्यातील मुरबाडचे झपाट्याने नागरिकरण होत आहे. त्यामुळे कल्याण ते मुरबाड दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढली आहे. त्या तुलनेत एसटीच्या फेऱ्या कमी असल्याने प्रवाशांना आगारातच ताटकळत बसावे लागत आहे.
मुरबाड आगारात ५४ बस कार्यरत आहेत. त्यापैकी डिझेलवर चालणाऱ्या ४७ बस आहेत. तर ९ बस सीएनजीवर चालत आहेत. त्यापैकी मुरबाड - कल्याण महामार्गावर सध्या सहा सीएनजीच्या बसच्या सकाळी ते दुपारपर्यंत फक्त १८ फेऱ्या होत आहेत. तर उरलेल्या तीन बस आगारातच पडून आहेत. मुरबाडमध्ये महामंडळाचा सीएनजी पंप नसल्यामुळे बस गाड्यांना भिवंडी येथे जाऊन सीएनजी भरावा लागत आहे. त्यामुळे मुरबाड ते भिवंडी दरम्यानच्या अंतरामुळे भिवंडी ते मुरबाड येण्यासाठी उशीर होत आहे. त्यामुळे प्रवाशांवर आगारातच ताटकळत बसावे लागत आहे. मुरबाड आगाराला चांगल्या बस मिळण्यासाठी विविध माध्यमातून पाठपुरावा केला जात आहे. परंतु, दोन महिन्यांपासून कोणत्याही प्रकारची हालचाल झालेली नाही. त्यामुळे कल्याणवरून मुरबाडला येणाऱ्या प्रवाशांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
------------------------------------------
मुरबाड आगारात सीएनजीवर चालणाऱ्या ९ बस आहेत. या बस सीएनजी भरायला भिवंडीला जात असल्याने कल्याण- मुरबाड मार्गावरीवरील एसटीचे वेळापत्रक कोलमडते. त्यामुळे मुरबाड स्थानकातच प्रवाशांना बस वाट पाहत थांबावे लागते. अशातच रस्ते काँक्रिटकरणाची पण विविध कामे सुरू असल्याने एका फेरीला दीड ते दोन तासांचा अवधी लागत आहे. यासाठी वरिष्ठ पातळीवर स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, प्रवाशांच्या माध्यमातून पाठवा सुरू आहे. मात्र, त्याला अपेक्षित यश आलेले नाही.
--------------------------------------------
मुरबाड-कल्याण महामार्गावर जाणाऱ्या प्रवाशांना सध्या उन्हात राहावे लागत आहे. त्यासाठी वरिष्ठ पातळीवर शेड बांधण्याची मागणी केली आहे. तसेच बसची संख्या वाढवण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
- योगेश मुसळे, आगारप्रमुख, मुरबाड
--------------------------------------------------
मुरबाड कल्याण मार्गावर सकाळी सात ते दहा तसेच सायंकाळी चार ते रात्री ८ या दरम्यान दर पंधरा मिनिटांत बससेवा उपलब्ध व्हावी, यासाठी २००६ पासून पाठपुरावा करत आहोत. मुरबाड आगारात बस कमी असतील तर कल्याण आगारातून जादा बसची व्यवस्था करणे गरजेचे आहे.
- ज्ञानेश्वर मुरबाडे, प्रवासी संघटना, मुरबाड