GT vs PBKS: कॅप्टन श्रेयस अय्यरचं शतक हुकलं, पंजाबच्या सर्वोच्च धावा; मॅक्सवेलने मात्र १९ व्यांदा शून्यावर आऊट होत रोहितला टाकलं मागे
esakal March 26, 2025 04:45 AM

मंगळवारी (२५ मार्च) इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेचा पाचवा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात खेळवला जात आहे. हा सामना अहमदाबादमधील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात पंजाब किंग्सने गुजरातसमोर २४४ धावांचे तगडे आव्हान विजयासाठी ठेवले आहे.

पंजाबसाठी पहिल्याच सामन्यात कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. पण त्याचे शतक थोडक्यात हुकलं. दरम्यान, पंजाब किंग्सने या सामन्यात खेळताना आपली दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्याही उभारली.

या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रथम फलंदाजीसाठी उतरले. त्यांच्याकडून प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग यांनी सलामीला फलंदाजी केली.

प्रियांशने सुरुवातीलाच आक्रमक पवित्रा घेतला, त्याला प्रभसिमरन साथ देत होता. पण चौथ्या षटकात प्रभसिमरनला कागिसो रबाडाने अर्शद खानच्या हातून ५ धावांवर झेलबाद केले.

यानंतर मात्र प्रियांशला कर्णधार श्रेयस अय्यरची चांगली साथ मिळाली. त्यांच्यात आक्रमक अर्धशतकी भागीदारीही झाली. पण अखेर ७ व्या षटकात प्रियांश आर्यला राशिद खानने साई सुदर्शनच्या हातून झेलबाद केले. प्रियांश २३ चेंडूत ४७ धावा करून बाद झाला.

त्यानंतरही अझमतुल्ला ओमरझाईने श्रेयसला साथ देण्याचा प्रयत्न केला, पण तो १५ चेंडूत १६ धावा करून ११ व्या षटकात बाद झाला. त्याला बाद केल्यानंतर साई किशोरने पुढच्याच चेंडूवर ग्लेन मॅक्सवेलला शून्यावरच पायचीत पकडले.

त्यामुळे मॅक्सवेलची ही आयपीएलमध्ये शून्यावर बाद होण्याची १९ वी वेळ आहे. तो आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा शून्यावर बाद होणारा खेळाडू ठरला आहे. त्याने रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिकला मागे टाकले. हे दोघे प्रत्येकी १८ वेळा शून्यावर बाद झालेत.

दरम्यान, श्रेयस अय्यर त्याच्या लयीत खेळत होता. तो गुजरातच्या कोणत्याच गोलंदाजाला स्थिरावू देत नव्हता. त्याला काही काळ मार्कस स्टॉयनिसने साथ दिली. पण तोही १५ चेंडूत साई किशोरविरुद्धच २० धावांवर अर्शद खानकडे झेल देत बाद झाला. तरी शशांक सिंगने गेल्यावर्षीचाच फॉर्म कायम ठेवताना वादळी खेळ केला.

शशांकने शेवटचं षटक पूर्ण खेळून काढताना ५ चौकार ठोकले. पण त्यामुळे श्रेयस अय्यरचं शतक हुकलं. तो ४२ चेंडूत ९७ धावांवर नाबाद राहिला. या खेळीत त्याने ५ चौकार आणि ९ षटकार मारले. शशांक सिंग ४४ धावांवर नाबाद राहिला. त्याने १६ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह ही खेळी केली. त्यामुळे पंजाब किंग्सने २० षटकात ५ बाद २४३ धावा केल्या.

गुजरात टायटन्सकडून गोलंदाजी करताना आर साई किशोरने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच कागिसो रबाडा आणि राशिद खान यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.