- रिना भुतडा, करिअर समुपदेशक
योग्य करिअर मार्ग निवडणे हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय असतो. मात्र, बऱ्याच वेळा पालक आणि विद्यार्थ्यांच्या अनवधानाने होणाऱ्या सामान्य चुकांमुळे विद्यार्थ्याचे भविष्यात नुकसान होऊ शकते.
प्रतिष्ठित कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश मिळवण्याचा तणाव, सोशल मीडियाचा प्रभाव, स्पर्धेचा अंदाज नसणे आणि अवास्तव अपेक्षा यामुळे चुकीची शाखा, प्रवेश परीक्षा, कोर्स इ. निवड अनेकदा केली जाते. खाली दिलेल्या पाच प्रमुख चुका प्रत्येकाने टाळल्या पाहिजेत.
कमी वाचनामुळे विविध करिअरविषयी माहितीचा अभाव
आजच्या डिजिटल युगात माहिती सहज उपलब्ध असली तरीही विद्यार्थी विविध करिअर पर्याय शोधण्यासाठी स्वतः प्रयत्न करत नाहीत. पुस्तके, वृत्तपत्रे, करिअर मार्गदर्शक मासिक, अधिकृत संकेतस्थळ वाचण्याची सवय कमी होत चालली आहे, त्यामुळे त्यांची पारंपरिक आणि नव्या क्षेत्रांबद्दलची माहिती मर्यादित राहते.
त्याऐवजी, विद्यार्थी इंटरनेटवरील झटपट माहितीवर किंवा सोशल मीडियावरील काही दिशाभूल होऊ शकणाऱ्या गोष्टींवर अवलंबून राहतात, ज्यामुळे त्यांच्या संधी मर्यादित होतात. तज्ज्ञांशी व यशस्वी विद्यार्थ्यांशी चर्चा प्रेरणादायी ठरू शकते.
अवास्तव अपेक्षा - टॉप सरकारी किंवा प्रतिष्ठित महाविद्यालयांमध्ये प्रवेश हवा
चांगले महाविद्यालय मिळवणे महत्त्वाचे आहेच, परंतु यश मिळवण्यासाठी फक्त टॉप सरकारी किंवा नावाजलेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळणे गरजेचे आहे, हा दृष्टिकोन अनावश्यक तणाव निर्माण करतो आणि अपेक्षेनुसार प्रवेश न मिळाल्यास निराशा देतो, अनेकदा ड्रॉप घेण्याचा निर्णय होतो. प्रत्यक्षात, त्या कॉलेजसाठी लागणारा पर्सेंटाइल स्कोअर (कट ऑफ), रँक, उपलब्ध जागा, आरक्षण, पर्यायी महाविद्यालय इ. याची पूर्ण माहिती घेतलेली नसते.
आत्मपरीक्षण करताना प्रामाणिक नसणे
योग्य करिअर निवडण्यासाठी स्वतःचे योग्य आत्मपरीक्षण करणे महत्त्वाचे असते. मात्र, अनेक विद्यार्थी आपले खरे आवडीनिवडी आणि क्षमतांचा विचार न करता, मित्रमंडळी, पालक किंवा समाजाच्या प्रभावाखाली करिअर निवडतात. काही जण कोचिंग क्लासमध्ये ‘सीट फूल होतील’ या भीतीमुळे प्रवेश घेतात, मात्र त्यांना प्रत्यक्षात तो अभ्यासक्रम आणि प्रवेश परीक्षा, त्यातील यशाचा दर इ. त्यांच्या क्षमतेला योग्य आहे की नाही, हे माहीत नसते.
यूट्यूबर्सचा प्रभाव आणि सोप्या मार्गांचा मोह
डिजिटल माध्यमांमुळे यशासाठी शॉर्टकट्स असल्याचा गैरसमज वाढला आहे. यूट्यूबर्स करिअरला सोपे व ग्लॅमरस दाखवतात, त्यामुळे विद्यार्थी ट्रेंडिंग करिअर निवडतात. अभ्यासही लॅपटॉप, युट्युब, आयपॅड यामधून करताना दिसतायत, मात्र प्रत्यक्षात यशासाठी पुस्तकाद्वारे वाचन व लेखन याचा अभाव होताना दिसतो.
फक्त प्लॅन ‘ए’वर भर, प्लॅन ‘बी’ किंवा ‘सी’चा विचार नाही
एकाच प्लॅनवर भर न देता पर्यायी योजना महत्त्वाची आहे. निश्चित उद्दिष्ट चांगले असले तरी, अपयश आल्यास पर्याय असावेत. केवळ एकाच प्लॅनवर अवलंबून राहिल्यास तणाव वाढतो आणि संधी मर्यादित होतात. उदा. ‘जेईई’ देणाऱ्यांसाठी ‘बीटसॅट’ प्लॅन ‘बी’, तर ‘सीईटी’ प्लॅन ‘सी’ असू शकतो.
निष्कर्ष
करिअर निवडताना क्षमता, आवड, ध्येय, संधी, प्रवेश परीक्षा, त्यातील स्पर्धा व पर्यायी मार्ग यांचा सखोल अभ्यास करावा. पालकांनी अपूर्ण इच्छा लादू नयेत आणि विद्यार्थ्यांनी पॅकेज व स्कोपच्या प्रभावाखाली न जाता माहितीपूर्ण निर्णय घ्यावा. ट्रेंड्सऐवजी योग्य संशोधन, आत्मचिंतन, लवचिक दृष्टिकोन आणि खुला संवाद केल्यास यशस्वी व समाधानकारक करिअर मार्ग मिळू शकतो.