अनुवादासाठी हवे भाषांवर प्रभुत्व!
esakal March 26, 2025 02:45 PM

- डॉ. शुचिता नांदापूरकर-फडके, लेखिका, अनुवादक

इतर भाषेतील साहित्य आपल्या मातृभाषेत वाचण्याची संधी अनुवादामुळे मिळते. आता इंग्रजीबरोबरच जर्मन, स्पॅनिश, फ्रेंच यांसारख्या परकीय भाषांतील साहित्यही मराठीमध्ये येऊ लागले आहे. अनुवादामुळे केवळ साहित्याशी नाही, तर एका संपूर्ण वेगळ्या संस्कृतीशी, वाचकाची नाळ जुळते. नवीन विषय कळतात, अपरिचित क्षेत्रातील सूक्ष्म माहितीही मिळू शकते.

अनुवादक व्हावं असं केव्हा वाटलं?

- वयाच्या ४०-४५ वर्षापर्यंत मी विविध गोष्टी केल्या. शिक्षिका म्हणून काम केलं. अभ्यासाची आवड असल्यामुळे एच.आर.मध्ये एमबीए केलं, मानसशास्त्रात एम.ए. केलं. या दरम्यान मुद्रितशोधन करावं अशी इच्छा झाली. ते करत असताना प्रकाशकांकडून संपादनाचं काम मिळालं. पुढची २-३ वर्षे मी इंग्रजी व मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये संपादनाचं काम केलं. त्यानंतर अनुवादाची संधी मिळाली.

अनुवादासाठी मिळालेल्या पहिल्या पुस्तकाचं पहिलं पान करतानाच मला लक्षात आलं की, मला जे हवं होतं, ते हेच आहे. मला हे काम आवडत गेलं आणि त्यातच रमले. ‘फिश फिलॉसॉफी’च्या चार पुस्तकांची मालिका हा मी केलेला पहिला अनुवाद. मी अनुवादाकडे खूप सहजपणे वळले. आज सुमारे १५ वर्षांपासून अनुवादाच्या क्षेत्रात आहे याचा आनंद वाटतो.

अनुवादकाकडे कोणती कौशल्ये असावीत?

- महत्त्वाचं कौशल्य म्हणजे, चिकाटी. अनुवाद करण्यासाठी बैठक करण्याची तयारी हवी. स्रोत भाषा आणि लक्ष्य भाषा म्हणजे ज्यातून अनुवाद करायचा आहे आणि ज्यात तो होणार आहे अशा दोन्ही भाषांवर प्रभुत्व हवं. ते नसेल, तर तो अनुवाद न होता केवळ शब्दांतरण होतं. त्यासाठी विविध शब्दकोशांचा आधार घ्यायची सवय लागते. लेखक एका विषयावर ३-४ वर्षे घेऊन काम करू शकतो.

अनुवादकाला मात्र फक्त काही महिने मिळतात. तसंच, कोणताही विषय समोर येतो. अशा वेळी अनुवादासाठी समोर आलेल्या विषयाचा थोडा अभ्यास करणं, संकल्पना समजून घेणं, गरज पडल्यास त्यातील तज्ज्ञ व्यक्तींना भेटणं हेही करावं लागतं. त्याचा फायदाच होतो.

या क्षेत्रात येण्यासाठी पूर्वतयारी कशी करावी?

- ज्या भाषांमध्ये आपल्याला काम करायचं आहे. त्यामध्ये उदंड वाचन करावं लागतं. त्या भाषांमधल्या शब्दांच्या छटा, त्यांचा वापर, शब्दसौंदर्य अशा विविध घटकांशी परिचय असावा लागतो. पुरेसा वेळ देण्याची तयारी असावी लागते. तंत्रज्ञानामुळे उपलब्ध झालेल्या सोयी-सुविधांचा वापर करण्याचे कसब अंगी असावे लागते. जे पुस्तक तुम्ही अनुवादित करणार आहात, त्याचं वाचन आधी किमान दोन-तीनदा झालेलं असावं.

अनुवाद करताना...

  • संयमाची, कष्टांची पराकाष्ठा करण्याची तयारी ठेवा.

  • संपादन, मुद्रितशोधक आहेत ना, अशा आविर्भावात राहू नका. आपले काम अधिकाधिक अचूकपणे करा.

  • शुद्धलेखन अधिकाधिक निर्दोष ठेवा व स्वसंपादनही करा.

  • जिथे का वाटते तिथे स्वतःच्या मनाने काहीही न लिहिता तज्ज्ञांना विचारा.

(शब्दांकन - मयूर भावे)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.