53584
पतंजली समितीतर्फे कुडाळात योगाचे धडे
शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; जिल्ह्यातील १५० साधकांची उपस्थिती
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २६ः पतंजली योग समिती सिंधुदुर्गच्या वतीने आयोजित केलेल्या संयुक्त योगोपचार शिबिराचा येथील रविकमल हॉलमध्ये सांगता समारंभ झाला. सुमारे १५० योग साधकांची दररोज उपस्थिती या शिबिरास लाभली.
कुडाळ शहरात योग प्रसाराचे कार्य वेगाने चालू आहे. कुडाळ येथे संयुक्त योगोपचार शिबिरामध्ये पतंजली योग समितीमार्फत विशेष योगाभ्यास घेण्यात आला. पाच दिवसांचे हे योग शिबिर यशस्वीपणे पार पडले. अनेक योगसाधकांनी या शिबिरामध्ये सहभाग घेऊन योगाभ्यासाचा लाभ घेतला. शिबिराचा सांगता समारंभ योगवर्गात घेण्यात आला. यावेळी कुडाळ नायब तहसीलदार अमरसिंह जाधव, डॉ. प्रशांत परब, अमित सामंत यांच्या हस्ते पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी शेखर बांदेकर यांना शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. यावेळी कुडाळ नगरसेविका सई काळप, अमित सामंत, हॉलचे मालक रवींद्र राऊळ, योगशिक्षक जगन्नाथ प्रभू, यशवंत नाईक, राजेंद्र मुळीक, प्रा. प्रशांत केरवडेकर आदी उपस्थित होते.
या शिबिरामध्ये पतंजलीचे जिल्हाप्रभारी शेखर बांदेकर यांनी सतत पाच दिवस शिबिर घेतल्यामुळे सर्व शिबिरार्थींचे आभार व्यक्त केले. सूत्रसंचालन शादा वजराटकर आणि आभार विलास परब यांनी मानले. शिबिरासाठी रवींद्र राऊळ यांनी हॉल मोफत उपलब्ध करून दिला. त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. हा वर्ग रविकमल हॉल येथे सुरू असून साधकांनी शास्त्रोक्त पद्धतीने योग अभ्यास शिकावा, असे आवाहन केले आहे.