Myanman Eathquake: म्यानमारमध्ये काल शक्तीशाली 7.7 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपानं संहार घडवून आणला आहे. यामुळं अनेक गगनचुंबी इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. तर अनेक घरंही उद्ध्वस्त झाली आहेत. यामध्ये आत्तापर्यंत 1002 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर 2376 लोक जखमी झाले आहेत, म्यानमारच्या लष्करानं ही माहिती दिली आहे.
चोवीस तासात ११ वेळा म्यानमार भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला असल्याची माहिती स्थानिक यंत्रणांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, म्यानमारला या संकट काळात शेजारी असलेल्या भारतानं मदतीचा हात दिला असून यासाठी ऑपरेशन ब्रह्मा सरु करण्यात आलं आहे.
म्यानमारमधील दुसरे सर्वात मोठे शहर असलेल्या मंडाले हे या शक्तीशाली भूकंपाचं केंद्र होतं. हा भूकंप इतका शक्तिशाली होता की, 900 किलोमीटर दूर असलेल्या बँकॉकलाही त्याचा झटका बसला. यामुळं अनेक मोठ्या इमारती आणि पूल कोसळले. तसंच भारतातील मेघालय आणि मणिपूरसह इतर काही भागांमध्ये तसंच बांगलादेशमध्ये, विशेषत: ढाका आणि चट्टोग्राम तसंच चीनमध्येही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.
दरम्यान, भारतानं नेहमी प्रमाणं शेजारधर्म पाळताना म्यानमारवर ओढवलेल्या या भीषण परिस्थितीत मदतीचा हात पुढे केला आहे. यासाठी ऑपरेशन ब्रह्मा लॉन्च करण्यात आलं आहे. या मोहिमेंतर्गत म्यानमारला भारत सरकारकडून मदत दिली जात आहे. मदतीच्या या पहिल्या खेपेत भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाद्वारे टेंट, ब्लँकेट, स्लिपिंग बॅग, जेवणाची पाकीटं, स्वच्छतेचं कीट, जनरेटर आणि काही महत्वाची औषधं अशी १५ टन मदत म्यानमारची राजधानी रंगूनमध्ये पोहोचली आहे.